पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला दहशतवादी हल्ला झाला. यात भारताचे ४०हून जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर १२ दिवसांनी आज, मंगळवारी भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली. भारतीय वायुसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडे तीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हजार किलोचा बॉम्ब फेकले आणि तळ उध्वस्त केले. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. १२ मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचेही सांगितले जात आहे.

या हल्ल्यानंतर भारतीय वायुदलाचे आणि मोदी सरकारचे सर्वत्र आभार मानले जात आहेत तसेच कौतुक केले जात आहे. सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत साऱ्यांनी वायुसेनेला सलाम केला आहे. भारतासाठी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवणाऱ्या साक्षी मलिक हिने याबाबत ट्विट केले आहे. दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राईक हीच खऱ्या अर्थाने शुभ सकाळ असे ट्विट साक्षीने केले आहे. तसेच या ट्विटमधून तिने पंतप्रधान मोदी आणि सरकाचे आभार मानले आहे. तसेच भारतीय लष्कराला सलाम केला आहे.

दरम्यान, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारतीय वायूसेनेच्या विमानांनी लोक LOC चे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. या हल्ल्यात किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या हल्ल्यात सुमारे २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानी लष्कराने भारतीय विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई केल्याचे वृत्त मान्य केले आहे.