शानदार कामगिरीसह सुवर्णपदक पटकावणारा योगेश्वर दत्त पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेण्याची चिन्हे आहेत. अजिंक्यपद स्पर्धेनंतर इन्चेनॉन, दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी तंदुरुस्त राहण्यासाठी योगेश्वरने हा निर्णय घेतला आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धा यांच्यात केवळ दहा दिवसांचे अंतर आहे. दुखापतीची शक्यताही संभवते, या स्पर्धेत दुखापतग्रस्त झाल्यास आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळता येणार नाही, त्यामुळे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेण्याचा विचार आहे, असे योगेश्वरने सांगितले. आशियाई क्रीडा स्पर्धेत आणखी अव्वल संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धा तीव्र होईल, आशियाई क्रीडा स्पर्धेत लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे त्याने पुढे सांगितले.