तीन वेळा हिंद केसरी किंवा महाराष्ट्र केसरी मल्लांसाठी मुख्यमंत्र्याची घोषणा

महाराष्ट्रातील मल्लांनी जगभर नावलौकिक मिळवला असून कुस्तीला ऊर्जितावस्था आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तसेच पैलवानांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक असून तीन वेळा हिंद केसरी किंवा महाराष्ट्र केसरी ठरलेल्या पैलवानांची थेट पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.

महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आणि आपल्या विविध मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. त्यावेळी मुख्यमंत्र्यानी ही माहिती शिष्टमंडळाला दिली. यावेळी आमदार राहुल कुल, बाळा भेगडे, चंद्रदीप नरके, क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, पापालाल कदम, महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, राहुल काळभोर, बापू लोखंडे आदी उपस्थित होते. राज्यातील पैलवानांना सध्या केवळ सहा हजार रुपये निवृत्तिवेतन मिळत असून हिंद केसरी पैलवानांना २५ हजार तर महाराष्ट्र केसरी पैलवानांना २० हजार रुपये वाढीव निवृत्तिवेतन मिळावे, अशी मागणी यावेळी संघटनेच्या वतीने दीनानाथ सिंह यांनी केली. पूर्वी युती सरकारच्या काळात पैलवानांना एसटीचा प्रवास मोफत होता. मात्र ही सुविधा बंद करण्यात आली असून ती पुन्हा सुरू करावी, स्पर्धेसाठी गेलेल्या पैलवानांना शासकीय विश्रामगृहात सोय व्हावी, वैद्यकीय सुविधा मिळाव्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

त्यावर तीन वेळा महाराष्ट्र केसरी व हिंद केसरी पैलवानांना पोलीस उपनिरीक्षकऐवजी पोलीस उपअधीक्षक करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून पैलवानांच्या निवृत्तिवेतनाबाबतचा आराखडा क्रीडा विभागाने तयार करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यानी यावेळी दिल्या. निवृत्तिवेतनासाठी वयाची अट न टाकता हा प्रस्ताव तयार करावा. पैलवानांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पैलवानांचा महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत समावेश करून त्यांना आरोग्य पत्रिका द्याव्यात, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यानी यावेळी केली.