ऑलिम्पिक पदकविजेत्या साक्षीला कांस्य

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारतीय कुस्तीपटूंनी पदकांची मालिका कायम राखताना ११व्या दिवशी दोन सुवर्ण व दोन कांस्यपदके जिंकली. विनेश फोगाट (५० किलो) आणि सुमित (१२५ किलो) यांनी आपापल्या गटात सुवर्णपदकाची कमाई केली, तर रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकला (६२ किलो) तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. सोमवीरनेही (८६ किलो) वजनी गटात कांस्यपदक पटकावले. भारतीय कुस्तीपटूंनी आत्तापर्यंत पाच सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्यपदके अशी एकूण १२ पदके पटकावली आहेत.

विनेशने जोरदार पुनरागमनाचा कित्ता अंतिम लढतीतही गिरवला. २३ वर्षीय खेळाडूला रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत दुखापत झाली होती. त्यानंतर तिने अथक मेहनतीने येथे सुवर्णपदकाच्या लढतीपर्यंत मजल मारली. विनेशने नायजेरियाच्या जेनेसिस मिइसीनीईवर ३-१ असा विजय मिळवत भारताच्या खात्यात सुवर्णपदकाची भर टाकली.

सुमितला सुवर्णपदकासाठी फार संघर्ष करावा लागला नाही. त्याने नायजेरियाचा प्रतिस्पर्धी सिनीव्हीए बोल्टीकला ५-० असे सहज नमवले. सोमवीरनेही कांस्यपदक निश्चित करताना कॅनडाच्या मुर अलेक्झांडरवर ३-१ असा विजय मिळवला.

पहिल्याच फेरीत पराभूत झाल्यामुळे साक्षी सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाद झाली. तिला कॅनडाच्या मिचेल फझारीने पराभूत केले. मात्र कांस्यपदकाच्या लढतीत साक्षीने न्यूझीलंडच्या टायला फोर्डवर अटीतटीच्या लढतीत ६-५ असा विजय मिळवला.

स्क्वॉश : दीपिका-सौरवला रौप्यपदक

दीपिका पल्लीकल आणि सौरव घोषाल जोडीने राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथमच मिश्र दुहेरीमध्ये रौप्यपदक पटकावले. सामना संपल्यानंतर मात्र दीपिकाने सामनाधिकाऱ्यांच्या वादग्रस्त निर्णयांबाबत नाराजी प्रकट केली.भारतीय जोडीने अंतिम फेरीत जोरदार संघर्ष केला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या डोन्ना उक्र्वाहार्ट आणि कॅमेरून पिल्ले जोडीने ११-८, ११-१० अशा फरकाने सुवर्णपदक प्राप्त केले. ‘‘अंतिम फेरीतील बरेचसे निर्णय धक्कादायक होते. हे निर्णय योग्य दिले गेले असते, तर सामन्याचे संपूर्ण चित्र पालटले असते. परंतु शेवटी हा खेळ आहे. सुवर्णपदक हुकल्याची खंत वाटत आहे. या आठवडय़ात आम्ही जे काही कमावले, त्याचा अभिमान आहे,’’ असे दीपिकाने सांगितले.