भारताचा अनुभवी कुस्तीपटू नरसिंह यादवने ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी पुन्हा निवड चाचणी घेण्याची के लेली मागणी भारतीय कुस्ती महासंघाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या नरसिंहचे सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न भंगले आहे.

सोफिया (बल्गेरिया) येथे पुढील महिन्यात अखेरची ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धा होणार आहे. महासंघाने ७४ किलो वजनी गटात नरसिंहऐवजी अमित धनकरची निवड केली आहे. ६ ते ९ मे रोजी ही स्पर्धा होणार आहे. मात्र ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची ही संधी हुकल्यामुळे २०१५मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवणाऱ्या नरसिंहने नाराजी व्यक्त केली आहे. उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्यामुळे २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमधून नरसिंहला हद्दपार करण्यात आले होते. याचप्रमाणे बंदीची कारवाईही करण्यात आली होती.

‘‘जानेवारीत झालेल्या कुस्ती मानांकन स्पर्धेत नरसिंह स्वत:ला सिद्ध करण्यात अपयशी ठरला. अमितने सर्व निवड चाचण्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावरील सर्वोत्तम कामगिरी केली. त्यामुळेच नरसिंहला वगळून अमितला प्राधान्य देण्यात आले,’’ असे महासंघाने स्पष्ट केले.