भारतीय कुस्ती महासंघाचा कठोर निर्णय

उत्तेजक चाचणीत कुस्तीपटू दोषी आढल्यास त्याचे प्रशिक्षक आणि अन्य साहाय्यक मार्गदर्शकांवर बंदीची कारवाई करण्यात येणार आहे, असा निर्णय भारतीय कुस्ती महासंघाने शुक्रवारी घेतला. उत्तेजकांचे सेवन करून कुस्ती या खेळाला काळिमा फासणाऱ्या खेळाडूंवर संघटनेकडून कारवाई होते. परंतु त्यांचे प्रशिक्षक आणि साहाय्यक मार्गदर्शकसुद्धा तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे, असे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी सांगितले.

जागतिक कुस्ती संघटनेला मोठा आर्थिक दंड भरावा लागल्यामुळे भारतीय संघटनेनेही हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. याचप्रमाणे राष्ट्रीय शिबिरात कोणत्याही खेळाडूकडे बंदी असलेली उत्तेजके आढळल्यास प्रशिक्षकाला निलंबित करण्यात येईल, असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.

‘‘आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्तेजकांच्या काही घटनांमुळे भारतीय कुस्ती संघटनेने हे गंभीर पाऊल उचलले आहे. उत्तेजकांच्या घटनांमुळे जागतिक कुस्ती संघटनेने भारताला ३२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आणि दोन खेळाडूंवर बंदी घातली आहे,’’ असे अध्यक्ष बृजभूषण यांनी सांगितले.