जागतिक कांस्यपदक विजेता नरसिंग यादव हा ऑलिम्पिक प्रवेशिकेवर आपला दावा सांगत असला तरी ७४ किलो गटातील प्रवेशिकेसाठी मी निवड लढतीसाठी सज्ज आहे, असे ऑलिम्पिक रौप्य व कांस्यपदक विजेता मल्ल सुशील कुमारने सांगितले.

रिओ येथे ऑगस्टमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी नरसिंग व सुशील कुमार यांच्यापैकी कोणत्या खेळाडूला संधी द्यायची, याबाबत भारतीय कुस्ती महासंघाने निर्णय घेतलेला नाही. याबाबत सुशील म्हणाला, ‘‘माझी यापूर्वीची कामगिरी पाहून मला या स्पर्धेत पुन्हा संधी द्यावी असा मी आग्रह धरत नाही. मात्र आम्हा दोघा मल्लांपैकी श्रेष्ठ कोण आहे हे प्रत्यक्ष लढत घेऊनच ठरवावे असे माझे मत आहे. नरसिंगने मिळवलेली प्रवेशिका ही देशासाठी आहे, कोणत्याही एका खेळाडूसाठी नाही. जर एका स्थानासाठी दोन दावेदार असतील तर नियमानुसार चाचणी घेतली पाहिजे. ही पद्धत केवळ आपल्या देशात नसून, अन्य परदेशांतही अशाच प्रकारे चाचणी घेतली जाते. विद्यमान विश्वविजेता व ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेता जॉर्डन बुरोघ्स यालाही रिओ स्पर्धेसाठी चाचणीद्वारे जावे लागले आहे.’’

‘‘भारतीय क्रीडा प्राधिकरण व केंद्र शासनाने माझ्या तयारीसाठी भरपूर खर्च केला आहे. मी आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. ऑलिम्पिकसाठी मी भरपूर मेहनत करीत आहे व माझी तयारी अतिशय अव्वल दर्जाची आहे असा मला आत्मविश्वास आहे. जर मला रिओ येथील ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली तर पुन्हा ऑलिम्पिकपदक मिळवीन अशी मला खात्री आहे. १९९२ व १९९६च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडताना चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गत वेळी स्पर्धकांच्या अभावी चाचणी घेण्यात आली नव्हती,’’ असे सुशीलने सांगितले.

* रसिंगने लास व्हेगास येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवत भारताला ऑलिम्पिक प्रवेशिका मिळवून दिली होती. त्यानंतर या प्रवेशिकेसाठी महाराष्ट्रातील संघटक आपला हक्क सांगत आहेत.

  • सुशीलने २००८ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविले होते, तर २०१२ मध्ये त्याने रौप्यपदकाची कमाई केली होती. ही दोन्ही पदके त्याने ६६ किलो गटाच्या फ्रीस्टाईल विभागात मिळविली होती.
  • त्यानंतर त्याने ७४ किलो गटात भाग घेण्यास सुरुवात केली आहे.  या वजनी गटात त्याने २०१४ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून सर्वाना चकित केले होते.