||प्रशांत केणी
मुंबई : १९३६च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये अमरावतीच्या श्री हनुमान व्यायाम प्रसार मंडळाने मल्लखांब आणि हतुतू (कबड्डी) या मराठमोळ्या क्रीडा प्रकारांची प्रात्यक्षिके सादर केली होती. त्यानंतर तब्बल ८५ वर्षांनी मल्लखांबची प्रात्यक्षिके टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सादर होणार होती. परंतु करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ही ऑलिम्पिकवारी अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.

जर्मनीच्या यजमानपदाखाली १९३६मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात १ ऑगस्ट १९३६ रोजी मल्लखांब आणि अन्य काही क्रीडा प्रकारांची प्रात्यक्षिके श्री हनुमान व्यायाम प्रसार मंडळाच्या नेतृत्वाखाली क्रीडापटूंनी सादर केली होती. या भारतीय पथकाला जर्मनीचे चॅन्सेलर अ‍ॅडॉल्फ हिटलर यांनी प्रशस्तीपत्रके आणि प्लॅटिनम पदके देऊन गौरवले होते. त्या ऐतिहासिक घटनेची पुनरावृत्ती होती. पण टोक्योमधील आव्हानात्मक ऑलिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय मल्लखांब अद्याप दौऱ्यासाठी कंदील मिळावा, ही प्रतीक्षा करीत आहे.

‘‘मल्लखाबांच्या प्रात्यक्षिकांसाठीची आमची सर्व साहित्ये जपानमध्ये पोहोचली आहेत. परंतु कोणत्या तारखेला जायचे, याची अजूनपर्यंत तरी कोणतीही सूचना आलेली नाही. पण जपानमधील सद्य:स्थितीत निर्बंध मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे ऑलिम्पिक होईल, पण प्रात्यक्षिकांबाबत खात्री नसल्याचे संकेत मला जपानमधून मिळत आहेत,’’ अशी माहिती भारतीय मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष रमेश इंदोलिया यांनी दिली.

भारताच्या मल्लखांब पथकात २२ जणांचा समावेश असून, यात १४ खेळाडू आहेत, तर आठ जणांमध्ये मार्गदर्शक, पदाधिकारी आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व १८ वर्षांवरील व्यक्तींना यात स्थान देण्यात आले आहे. यात हनुमान प्रसारक मंडळाच्या क्रीडापटूंना प्राधान्याने स्थान देण्यात आले आहे.

याबाबत टोक्योमधील जपान मल्लखांब महासंघाचे सरचिटणीस विवेक साबळे म्हणाले की, ‘‘अखेरच्या क्षणीही ऑलिम्पिक रद्द होऊ शकते, असा इशारा मंगळवारी टोक्यो संयोजन समितीचे माजी अध्यक्ष तोशिरो मुटो यांनी दिला. पण टोक्योमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत असतानाही ऑलिम्पिकचे आयोजन करताना निर्बंध मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. स्पर्धा वगळता ऑलिम्पिकशी निगडित अनेक कार्यक्रमांना कात्री लावण्यात आली आहे. त्यामुळे मल्लखांबाच्या प्रात्यक्षिकांपुढेही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. ही वस्तुस्थिती असली तरी आम्ही आशावादी आहोत.’’