तब्बल ५० देशांमधले १०० जगभरात नावाजलेले कुस्तीपटू, विजेत्याला एक कोटी आणि उपविजेत्याला ५० लाख रुपयांचे इनाम असलेल्या गामा विश्वविजेत्या कुस्ती विश्वचषकाची रंगत डिसेंबरमध्ये साऱ्यांना अनुभवायला मिळणार आहे. या स्पर्धेचे साखळी फेरीतल सामने भारतात होणार असून उपांत्य आणि अंतिम फेरीच्या लढती दुबईमध्ये होणार आहेत. ही स्पर्धा फ्री-स्टाइल पद्धतीने ८५ ते १२५ अशा वजनी गटामध्ये होणार आहे.

‘या स्पर्धेसाठी विश्व कुस्तीगीर संघटनेची पुढील अकरा वर्षांसाठी मान्यता आम्हाला मिळाली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व बाबींची पूर्तता या वेळी  करणार आहोत. आंतरराष्ट्रीय नियमांनुसारच ही स्पर्धा खेळवण्यात येईल,’ अशी माहिती भारतीय कुस्ती महासंघाचे सचिव व्ही. एन. प्रसून यांनी दिली.

स्पर्धा अशी असेल

५० देशांतील शंभर कुस्तीपटूंना ४ विविध गटांमध्ये विभागण्यात येईल. या चार गटांमधून अव्वल दोन कुस्तीपटूंची मुख्य स्पर्धेसाठी निवड केली जाईल. मुख्य स्पर्धा रॉबिन राऊंड पद्धतीने खेळवण्या येईल आणि अव्वल चार कुस्तीपटू उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

भारतासाठी हिंद-ए-महाबली

या स्पर्धेत भारतातील दोन अव्वल कुस्तीपटूंची या विश्वचषकासाठी निवड केली जाईल. या दोन अव्वल कुस्तीपटूंसाठी हिंद-ए-महाबली ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर रॉबिन राऊंड पद्धतीमध्ये प्रत्येक कुस्तीपटूला नऊ सामने खेळावे लागणार आहेत.

बक्षिसांची खैरात

या स्पर्धेतील विजेत्याला एक कोटी रुपयांसह एक किलो सोन्याची गदा आणि सोन्याचा मुकुट दिला जाईल. उपविजेत्याला ५० लाख रुपये आणि पाच किलो वजनाची चांदीची ढाल दिली जाईल. त्याचबरोबर उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन्ही कुस्तीपटूंना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल.