17 December 2017

News Flash

सब कुछ सिखा हमने, ना सिखी होशियारी,सच है दुनियावालों, कि हम है अनाडी..

* तिसऱ्या कसोटीतही भारताची दयनीय अवस्था* कुकच्या सलग तिसऱ्या शतकामुळे इंग्लंडचे कसोटीवर नियंत्रण* धोनीचे

पी.टी.आय. कोलकाता | Updated: December 7, 2012 5:43 AM

* तिसऱ्या कसोटीतही भारताची दयनीय अवस्था
* कुकच्या सलग तिसऱ्या शतकामुळे इंग्लंडचे कसोटीवर नियंत्रण
* धोनीचे अर्धशतक; भारताची ३१६ धावांपर्यंत मजल
* इंग्लंडची १ बाद २१६ अशी दमदार सुरुवात

‘सब कुछ सिखा हमने, ना सिखी होशियारी, सच है दुनियावालों, कि हम है अनाडी..’ या ‘अनाडी’मधील गाण्याच्या ओळी भारतीय क्रिकेट संघाची अवस्था अगदी चपखलपणे मांडतात. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ‘धोनीहट्टा’पायी फिरकीला अनुकूल खेळपट्टी मिळूनही तेथे मर्दुमकी मात्र इंग्लिश संघाने गाजवली. त्यानंतर आता कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवरील पाटा खेळपट्टीवरही तिसऱ्या कसोटी सामन्यातही इंग्लंडच्या संघाने आपली पकड घट्ट केली आहे. कसोटी मालिकेत फिरकीच्या बळावर प्रतिस्पर्धी संघाला भारतीय भूमीवर ‘व्हाइट वॉश’ देण्याचे मनसुबे केव्हाच उधळले गेले आहेत. ‘होशियार’ इंग्लंड संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही प्रांतांमध्ये भारताला निष्प्रभ करीत आता तिसऱ्या कसोटीच्या वर्चस्वाकडे कूच केली आहे. इंग्लिश संघनायक अ‍ॅलिस्टर कुकने तिसऱ्या कसोटी सामन्यात सलग तिसरे शतक झळकावले आहे. त्यामुळेच इंग्लंडने तिसऱ्या कसोटी सामन्यावरील आपले नियंत्रण पक्के केले आहे.
कुक १३६ धावांवर खेळत असून, मोठी धावसंख्या उभारण्याकडे वाटचाल करणाऱ्या इंग्लंडने दुसऱ्या दिवसअखेर १ बाद २१६ अशी दिमाखदार सुरुवात केली आहे. भारताच्या पहिल्या डावातील ३१६ धावसंख्येला प्रत्युत्तर देताना कुक आणि निक कॉम्प्टन (५७) यांनी १६५ धावांची दमदार सलामी देत भारतीय गोलंदाजांना निष्प्रभ केले. पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी इंग्लंडला अद्याप १०१ धावांची आवश्यकता असून, त्यांचे नऊ फलंदाज शिल्लक आहेत. कुकने आपल्या कसोटी कारकिर्दीमधील २३वे शतक साकारताना सर्वाधिक शतके झळकावणारा तो इंग्लिश क्रिकेटपटू ठरला आहे. याचप्रमाणे कप्तान म्हणून पाच कसोटी सामन्यांत पाच शतके झळकावण्याचा विक्रमही कुकने गुरुवारी प्रस्थापित केला.
कुकने सुमारे पाच तास किल्ला लढवून १९ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने आपली संयमी खेळी उभारली. याचप्रमाणे कसोटी क्रिकेटमध्ये सात हजार धावांचा टप्पा ओलांडणारा कुक (२७ वष्रे ३४७ दिवस) सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. सचिन तेंडुलकरने २८ वष्रे १९३ दिवसांचा असताना हा टप्पा गाठला होता.
कुक १७ धावांवर असताना झहीर खानच्या गोलंदाजीवर चेतेश्वर पुजाराने त्याला जीवदान दिले होते. हे जीवदान मग भारताला महागात पडले. सध्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी स्थिती आहे. त्यामुळे मालिकेत पुन्हा रुबाबात परतण्याचे कठीण आव्हान भारतीय संघासमोर आहे.
सकाळच्या सत्रात बुधवारच्या ७ बाद २७३ धावसंख्येवरून भारताने आपल्या पहिल्या डावाला पुढे प्रारंभ केला. कप्तान महेंद्रसिंग धोनीने झुंजार फलंदाजीचा प्रत्यय घडवित अर्धशतक झळकावले. परंतु तरीही इंग्लिश गोलंदाजांनी फक्त तासाभरात भारतीय डावाला पूर्णविराम दिला. धोनीने ११४ चेंडूंत पाच चौकार आणि मॉन्टी पनेसारच्या फिरकी गोलंदाजीवर ठोकलेले दोन टोलेजंग षटकार यांच्यासहित ५२ धावा केल्या. तळाच्या फलंदाजांना साथीला घेत धोनीने भारतीय डाव लांबविण्याचा शर्थीने प्रयत्न केला. पण स्टीव्हन फिनच्या आखूड टप्प्याच्या गोलंदाजीवर धोनी सर्वात शेवटी बाद झाला.    

‘‘मी मैदानावर होतो आणि फलकावर कुक ७००० धावांचा टप्पा गाठणारा युवा क्रिकेटपटू ठरला, अशी वाक्ये दिसली. तो एक संस्मरणीय क्षण होता. इंग्लंडतर्फे सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजासोबत मी फलंदाजी करीत होतो. कुक हा फक्त २७ वर्षांचा आहे आणि त्याचे यश अतिशय बोलके आहे.’’
-निक कॉम्प्टन, इंग्लिश खेळाडू

.. तर कुकच्या खात्यावर १५,००० धावा आणि  ५० शतके जमा असतील -गावस्कर
नवी दिल्ली : इंग्लंडचा कप्तान अॅलिस्टर कुक जेव्हा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करेल, तेव्हा त्याच्या खात्यावर १५,००० धावा आणि ५० शतके जमा असतील, असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी प्रकट केले आहे. ‘‘कुकचा सध्याचा धावांचा ओघ पाहता १५ हजार कसोटी धावा आणि ५० शतके तो सहज साकारेल,’’ असे गावस्कर यांनी सांगितले. ‘‘फक्त दुखापती हा एकच घटक कुकला अडथळा ठरू शकेल. गंभीर दुखापत कुकच्या बहरणाऱ्या कारकिर्दीपासून दूर राहिल्यास तो हा टप्पा आरामात पार करू शकेल,’’ असे एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात गावस्कर यांनी सांगितले. ‘‘एकाग्रता ही देवाने दिलेली देणगी असते. कुक चेंडूकडे एकाग्रतेने पाहात राहतो, हे मला फार आवडते. नॉन-स्ट्रायकरला असतानाही तो चेंडूचे गांभीर्याने निरीक्षण करतो,’’ असे गावस्कर पुढे म्हणाले.    

धावफलक
भारत (पहिला डाव) : गौतम गंभीर झे. ट्रॉट गो. पनेसार ६०, वीरेंद्र सेहवाग धावचीत २३, चेतेश्वर पुजारा त्रिफळा गो. पनेसार १६, सचिन तेंडुलकर झे. प्रायर गो. अँडरसन ७६, विराट कोहली झे. स्वान गो. अँडरसन ६, युवराज सिंग झे. कुक गो. स्वान ३२, महेंद्रसिंग धोनी झे. स्वान गो. फिन ५२, रविचंद्रन अश्विन त्रिफळा गो. अँडरसन २१, झहीर खान पायचीत गो. पनेसार ६, इशांत शर्मा त्रिफळा गो. पनेसार ०, प्रग्यान ओझा नाबाद ०, अवांतर (बाइज-५, लेगबाइज-१३, नोबॉल-१, वाइड-५) २४, एकूण १०५ षटकांत सर्व बाद ३१६.
बाद क्रम : १-४७, २-८८, ३-११७, ४-१३६, ५-२१५, ६-२३०, ७-२६८, ८-२९२, ९-२९६, १०-३१६.
गोलंदाजी : जेम्स अँडरसन २८-७-८९-३, स्टीव्ह फिन २१-२-७३-१, मॉन्टी पनेसार ४०-१३-९०-४, ग्रॅमी स्वान १६-३-४६-१.
इंग्लंड (पहिला डाव) : अ‍ॅलिस्टर कुक खेळत आहे १३६, निक कॉम्प्टन पायचीत गो. ओझा ५७, जोनाथन ट्रॉट खेळत आहे २१, अवांतर (नोबॉल-२) २, एकूण ७३ षटकांत १ बाद २१६.
बाद क्रम : १-१६५
गोलंदाजी : झहीर खान १६-४-४८-०, इशांत शर्मा १५-६-३५-०, आर. अश्विन २३-४-६८-०, प्रग्यान ओझा १९-४-६५-१.     

First Published on December 7, 2012 5:43 am

Web Title: wretched condition of india in third test
टॅग Cricket,Sports