News Flash

साहाच्या खांद्याला गंभीर दुखापत

शस्त्रक्रियेमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेला मुकणार

शस्त्रक्रियेमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेला मुकणार

भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहा अंगठय़ाला झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे, हे सर्वश्रुत आहे. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) साहाच्या खांद्यावर गंभीर उपचार सुरू आहेत. पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये साहाच्या खांद्यावर शस्त्रक्रिया होणार असून, त्यामुळे वर्षांखेरीस होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेला त्याला मुकावे लागणार आहे.

‘‘राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचार घेणाऱ्या साहाची दुखापत गंभीर स्वरूपाची आहे. कारकीर्दीसाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या या दुखापतीतून सावरण्यासाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर किमान दोन महिन्यांनंतर त्याला बॅट हातात घेता येऊ शकते. त्यानंतरच मैदानावरील सरावाला प्रारंभ करता येऊ शकेल,’’ असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.

यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये साहाच्या अंगठय़ाला दुखापत झाल्यामुळे तो विश्रांती घेत होता. मात्र त्याची खांद्याची दुखापत गंभीर असल्याचे आता प्रकाशात आले आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आलेली नाही. मात्र बीसीसीआयकडून त्याच्या दुखापतीबाबत स्पष्टता करण्यात आली नव्हती. परंतु खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकावे लागणार आहे.

३३ वर्षीय साहाने नुकतेच आपल्या ‘ट्विटर’ खात्यावर ‘‘कठीण कालखंडातून जात आहे’’ असे नमूद करून लवकरच कणखरपणे परतेन, असा आशावाद प्रकट केला होता. ‘‘दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर झेल घेताना साहाच्या खांद्याला दुखापत झाली होती. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. त्याने खांद्याच्या दुखापतीमुळे नव्हे, तर मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे आफ्रिका दौऱ्यावरून माघार घेतली होती,’’ असे बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2018 2:07 am

Web Title: wriddhiman saha
Next Stories
1 शुक्ला यांच्या सहाय्यकाचे लाचखोरीप्रकरणी निलंबन
2 ‘ते’ कृत्य म्हणजे क्रिकेटच्या मैदानावर मी केलेली सर्वात लाजिरवाणी गोष्ट : जो रूट
3 तिरंग्यावरून अशोक चक्र गायब; आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने घातला गोंधळ
Just Now!
X