दुखापतीमुळे काही काळापासून भारतीय संघापासून दूर असलेला यष्टिरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहा येत्या डिसेंबरमध्ये रणजी सामन्याद्वारे पुनरागमन करण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात खांद्याला झालेल्या दुखापतीवर तो सध्या उपचार घेत असून वर्षअखेरीस निश्चितपणे पुन्हा खेळण्यास प्रारंभ करण्याबाबत त्याला विश्वास वाटत आहे.

‘‘मला आधीच्या तुलनेत आता खूप बरे वाटत आहे. डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत मी पुन्हा खेळण्यास प्रारंभ करणार असून त्या दृष्टीनेच माझे प्रशिक्षण आणि सराव सुरू आहे. नेटमध्ये सरावापुरता मी तंदुरुस्त असलो तरी प्रत्यक्ष सामना खेळण्याइतपत अद्याप सुधारणा नाही,’’ असे साहाने सांगितले.

यंदाच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत केपटाऊन येथे पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर खांद्याचे स्नायू आखडल्याने त्याला मायदेशी परतावे लागल्याने तो खूप निराश झाला होता. दरम्यान, आयपीएलमध्ये अंगठय़ाला दुखापत झाल्याने तो अफगणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यालाही मुकला होता. त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाल्याचे प्रत्यक्ष चाचण्या केल्यानंतर समजले.

दरम्यान, भारताने येत्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ऋषभ पंत आणि पार्थिव पटेल या दोन यष्टिरक्षकांची निवड केली आहे. तसेच त्यानंतर कोणतीही कसोटी मालिका लवकर होणार नसल्याने साहा प्रत्यक्ष कसोटीत पुनरागमन कधी करतो, त्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

त्यावर बोलताना साहा म्हणाला, ‘‘मला आता पुन्हा एकदा शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. रणजी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली तरच मला पुढील संधी मिळू शकणार आहे. अर्थात मी लहानपणापासून खूप सकारात्मक विचार करणारा आहे. त्यामुळे या सर्व बाबींकडेही मी त्याच सकारात्मकपणे पाहतो. दुखापतीनंतर खेळाडूचे तंदुरुस्त होणे ही खूप किचकट प्रक्रिया असते, मात्र सध्या त्याला पर्याय नाही.’’

साहा दशकभरातील सर्वोत्तम यष्टिरक्षक -गांगुली

वृद्धिमान साहा हा भारताचा गेल्या ५-१० वर्षांतील सर्वोत्तम यष्टिरक्षक आहे, अशा शब्दांत माजी कर्णधार सौरव गांगुलीने वृद्धिमानच्या कामगिरीचे कौतुक केले. २०१४ साली महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती स्वीकारल्यापासून भारताच्या कसोटी संघातील यष्टिरक्षक म्हणून साहा चोख कामगिरी पार पाडत आहे. लवकरात लवकर तंदुरुस्त होऊन तो संघात परतावा, अशी इच्छा असल्याचे गांगुलीने नमूद केले. प्रत्येक यष्टिरक्षकाला सूर मारून झेल पकडावे लागतात. त्यामुळे दुखापती टाळणे कुणाच्याही हातात नसते . केवळ चांगला खेळ  व तंदुरुस्तीसाठी प्रयास करणे शक्य नसते. त्यामुळे दुखापतीमधूनही साहा लवकरच बरा व्हावा, अशी अपेक्षा गांगुलीने व्यक्त केली.