भारतीय कसोटी संघाचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने आगामी आयपीएलच्या हंगामासाठी जोरदार सराव केला आहे. स्थानिक टी-२० स्पर्धेत खेळताना साहाने आक्रमक खेळी करत अवघ्या २० चेंडूमध्ये शतक ठोकलं आहे. या शतकी खेळीत साहाने १४ षटकार तर ४ चौकार लगावले आहेत. स्थानिक जे. सी. मुखर्जी चषक स्पर्धेत खेळताना, वृद्धिमान साहाने मोहन बागान संघाकडून खेळताना बंगाल नागपूर रेल्वेसंघाविरोधात अवघ्या २० चेंडूत नाबाद १०२ धावा केल्या आहेत.

अवश्य वाचा – IPL 2018 – विराटच्या रॉयल चँलेजर्सला धक्का, महत्वाचा खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर

वृद्धिमान साहाच्या या वादळी खेळीमुळे मोहन बागान संघाने प्रतिस्पर्धी संघाचं १५२ धावांचं आव्हान सहज पार केलं. वृद्धिमान साहाने अमन प्रोसादच्या गोलंदाजीवर षटकार खेचत आपल्या संघाचा विजय निश्चीत केला. “मी ज्यावेळी फलंदाजीसाठी मैदानात उतरलो, त्याचवेळी आज मी चांगली फलंदाजी करणार आहे याची मला खात्री वाटत होती. त्यामुळे आगामी आयपीएल सामने पाहता मी या स्पर्धेत विविध प्रकारचे फटके खेळण्याचा सराव करणार आहे.” सामना संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना साहा बोलत होता.

भारतीय संघाकडून केवळ कसोटी सामन्यांमध्ये यष्टीरक्षण करणाऱ्या साहाच्या नावावर, आयपीएलमध्ये २०१४ च्या हंगामात एका शतकाची नोंद आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरोधात साहाने हे शतक झळकावलं होतं. २०१८ साली होणाऱ्या अकराव्या हंगामासाठी सनरायजर्स हैदराबादने साहावर ५ कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात दाखल करुन घेतलं आहे. त्यामुळे स्थानिक स्पर्धेप्रमाणे आयपीएलच्या सामन्यांमध्येही साहाची बॅट अशीच तळपते का याकडे सर्व क्रीडाप्रेमींचं लक्ष असणार आहे.