भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये (आयओए) सध्या दोन गट पडले असून अध्यक्ष आणि उपाध्यक्षांमध्ये सध्या वादविवाद सुरू आहेत. निवडणुकीतील अनियमिततेमुळे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांची चौकशी करावी, असे लेखी पत्र उपाध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) पाठवले आहे. भारतीय अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी मात्र या वादात उडी घेत बात्रा यांची पाठराखण केली आहे.

निवडणुकीत अनियमितता असल्यामुळे बात्रा यांची चौकशी करावी. यासंदर्भात आपल्याकडे पुरावे आहेत, असा दावा करत मित्तल यांनी आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाख यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे. ‘‘मित्तल यांनी लावलेल्या बिनबुडाच्या आरोपांमुळे मला अतीव दु:ख झाले असून बात्रा हे प्रामाणिक आणि मेहनती अध्यक्ष आहेत,’’ असे सांगत सुमारीवाला यांनी बात्रा यांची पाठराखण केली आहे.

बाख यांनी मात्र मित्तल यांच्या ई-मेलला प्रत्युत्तर दिले नसले तरी बात्रा यांनी मात्र आपण कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचा दावा केला आहे. ‘आयओए’चे उपाध्यक्ष असलेल्या सुमारीवाला यांनी बाख यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘‘मित्तल यांच्यासारखे काही सदस्य स्वत:ला अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवण्यासाठी अशाप्रकारच्या युक्ती लढवतात. त्यांच्या दाव्यात कोणतेही तथ्य नाही. मेहनती आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या बात्रा यांचे लक्ष विचलित करण्याचे काम मित्तल करत आहेत.’’

मित्तल यांच्या तक्रारीचे ‘एफआयएच’कडून खंडन

२०१६ मधील निवडणुकीत अनियमितता असल्याबद्दल भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी केलेल्या तक्रारीचे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) खंडन केले आहे. बात्रा यांच्याकडून कोणत्याही नियमांचे उल्लंघन करण्यात आलेले नाही, असे सांगत मित्तल यांचा दावा फेटाळून लावण्यात आला आहे. ‘‘एफआयएचच्या नियमानुसार बात्रा यांनी कोणत्याही प्रकारे गैरव्यवहार केलेला नाही. त्यामुळे मित्तल यांच्या दाव्यात काहीच अर्थ शिल्लक राहात नाही,’’ असे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे एकात्मता विभागाचे अध्यक्ष वेन स्नेल यांनी सांगितले.