पीटीआय, साऊदम्पटन

भारताचा कर्णधार विराट कोहलीने (१२४ चेंडूंत नाबाद ४४ धावा) निर्धाराने किल्ला लढवला. त्यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीतील दुसऱ्या दिवशी भारताने पहिल्या डावात ३ बाद १४६ धावांपर्यंत मजल मारली. अंधुक प्रकाशामुळे ६४.४ षटकांनंतर खेळ होऊ शकला नाही.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिल्यानंतर त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी केली. रोहित शर्मा (६८ चेंडूंत ३४ धावा) आणि शुभमन गिल (६४ चेंडूंत २८ धावा) यांनी ६२ धावांची आश्वासक सलामी दिली. कायले जॅमीसनने भारताला पहिला हादरा दिला. रोहितने तिसऱ्या स्लिपमध्ये टिम साऊदीकडे झेल दिला. त्यानंतर नील व्ॉगनरने शुभमनला खेळपट्टीवर फार काळ टिकू दिले नाही.

पुजाराने पहिली धाव घेण्यासाठी ३६ चेंडू घेतले. व्ॉगनरला चौकार खेचून त्याने खाते उघडले. परंतु ५४ चेंडूंत फक्त ८ धावा काढणाऱ्या पुजाराला ट्रेंट बोल्टने पायचीत केले. मग ३ बाद ८८ अशा कठीण स्थितीतून कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी चौथ्या गडय़ासाठी ५८ धावांची भर घालून संघाला सावरले. खेळ थांबवण्यात आला, तेव्हा कोहली ४४ आणि रहाणे २९ धावांवर खेळत होता.

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : ६४.४ षटकांत ३ बाद १४६ (विराट कोहली खेळत आहे ४४, रोहित शर्मा ३४, अजिंक्य रहाणे खेळत आहे २९; कायले जॅमीसन १/१४)