वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा पाचवा दिवस भारतासाठी चांगला ठरला आहे. या दिवशी पहिल्या सत्रात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांवर वर्चस्व राखले. २ बाद १०१ धावांवरून पुढे खेळणाऱ्या न्यूझीलंडची उपाहारापर्यंत ५ बाद १३५ धावा अशी अवस्था झाली. बीजे वॉटलिंग हा बाद होणारा न्यूझीलंडचा पाचवा फलंदाज होता. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने त्रिफळा उडवत वॉटलिंगच्या स्वप्नांना सुरूंग लावला.

या सामन्यानंतर न्यूझीलंडचा सर्वोत्तम कसोटी यष्टीरक्षक म्हणून वॉटलिंग आपल्या कारकीर्दीची सांगता करेल. इंग्लंड दौर्‍यानंतर तो निवृत्ती घेणार आहे. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात वॉटलिंगला मोठी खेळी करण्याची सुवर्णसंधी होती, पण शमीने टाकलेला चेंडू त्याची दांडी घेऊन गेला. त्याला फक्त एक धाव करता आली. आता त्याला दुसऱ्या डावात चांगल्या धावा काढून कसोटी कारकिर्दीचा शेवट गोड करावा लागेल.

 

हेही वाचा – ‘‘आता हे सर्व सहन होण्यापलीकडे गेलंय”, दिनेश कार्तिकला आला राग

वॉटलिंगच्या नावावर कसोटी सामन्यात यष्टीरक्षक म्हणून २५७ बळी आहेत. ३५ वर्षीय वॉटलिंगने कसोटीत ८ शतके ठोकली असून २०५ ही त्याची वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या आहे. कसोटी क्रिकेटमधील सहाव्या विकेटसाठी पाच सर्वोत्कृष्ट भागीदारींपैकी दोन तन्यूझीलंडकडून असून त्या दोघांमध्ये वॉटलिंगचा समावेश आहे.

वॉटलिंगच्या नावावर ८ स्टंपिंगही आहेत. २०१९मध्ये ओव्हलमध्ये इंग्लंडविरुद्ध वॉटलिंगने दुहेरी शतक ठोकले होते. या सामन्यात न्यूझीलंडच्या विजयात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. वॉटलिंगने न्यूझीलंडकडून पाच टी-२० आणि २८ एकदिवसीय सामनेही खेळले आहेत.