पीटीआय, साऊदम्पटन

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पध्रेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडसारख्या दर्जेदार संघाविरुद्ध वास्तववादी रणनीती गरजेची असल्याचे मत भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने व्यक्त केले.

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अनेकदा न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना केला आहे. कसोटीतही तितक्याच आत्मविश्वासाने सामना करीन, असे रोहितला वाटते.

‘‘न्यूझीलंड संघाविरुद्ध मी अनेकदा खेळलो आहे. त्यामुळे त्यांची बलस्थाने आणि कच्चे दुवे यांची मला जाणीव आहे. इंग्लंडमधील वातावरण-खेळपट्टी, आम्ही प्रथम फलंदाजी करणार की नंतर अशा अनेक चर्चा रंगत आहेत. या मुद्दय़ांचा अतिविचार न करणे महत्त्वाचे असते,’’ असे रोहितने सांगितले.