वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडच्या साउथॅम्पटन मैदानात खेळला जात आहे. मात्र हा सामना जवळपास पाण्यात वाहून गेला आहे. दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित केलं जाण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर याने मजेशीर मीम्स सोशल मीडियावर शेअर केलं आहे. चौथा दिवसाचा खेळ पाण्यात वाया गेल्यानंतर त्याने हवामानाचं वृत्त आपल्या मीम्समधून देत संयुक्त विजेतेपदाबाबत एका गाण्याचा संदर्भ दिला आहे. बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या चित्रित झालेल्या ‘बांट लेंगे हम आधा-आधा’ या गाण्याचा संदर्भ दिला आहे.

वसीम जाफरने आपल्या ट्वीटमध्ये डोक्यावर हात मारलेला एक इमोजी टाकला आहे. क्रिकेट चाहत्यांप्रमाणे त्यानेही हा सामना पावसात वाया गेल्याने नाराजी व्यक्त केली आहे. आता विजेतेपद वाटून घेऊ असं त्याने मीम्समधून दर्शवलं आहे. हे मीम्स शेअर केल्यानंतर नेटकरी त्याला मजेशीर उत्तरं देत आहे. त्याचबरोबर त्याचं ट्वीट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. वसीम जाफर सोशल मीडियावर सक्रिय असतो.

पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्याने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला १९ जूनपासून सुरुवात झाली. नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि केन विल्यमसनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या दिवशी भारताने १४६ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली, पण विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे व्यतिरिक्त इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. भारत पहिल्या डावात ९२.१ षटकात २१७ धावा करू शकला. विराटने ४४ तर अजिंक्यने ४९ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने ३१ धावांत ५ बळी घेत भारताच्या डावाला सुरूंग लावला.

WTC Final: “संयुक्त विजेता घोषित करण्याऐवजी…”; माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांचा आयसीसीला सल्ला

त्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात २ बाद १०१ अशी मजल मारत सामन्यावरील पकड घट्ट केली आहे. इंग्लंडमध्ये सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या डेव्हॉन कॉन्वेच्या (१५३ चेंडूंत १२ चौकारांसह ५४ धावा) अर्धशतकाचा यात समावेश आहे.