WWE हा स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय शो म्हणून ओळखला जातो. अगदी युरोप अमेरिकेपासून आशिया खंडापर्यंत जवळपास १२२ देशांमध्ये WWE पाहिले जाते. भारतातही WWEची क्रेझ कमी नाही. त्यामुळे देसी प्रेक्षकांना खुश करण्यासाठी WWE ने एक नवा निर्णय घेतला आहे. WWE ची कॉमेंट्री आता यापुढे आपल्याला इंग्रजी ऐवजी हिंदी भाषेत ऐकायला मिळणार आहे.

WWE चे ब्रॉडकास्ट हक्क सोनी पिक्चर्स स्पोर्ट एंटरटेन्मेंट या मीडिया कंपनीने विकत घेतले आहेत. सुरुवातीला ‘रॉ’ आणि ‘स्मॅकडाउन’ हे दोन शो त्यांनी प्रायोगिक तत्वावर हिंदीमध्ये प्रदर्शित करण्यास सुरुवात केली होती. या प्रयोगाला प्रेक्षकांचा खुप चांगला प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहून आता WWE NXT, WWE स्पेशल इव्हेंट, WWE सुपरस्टार, रेसलमेनिया हे सर्व शो आणि सर्व मोठ्या स्पर्धा हिंदीमध्ये ब्रॉडकास्ट केल्या जाणार आहेत. WWEच्या हिंदी पर्वाची सुरुवात येत्या १५ जूनपासून होणार आहे.

सुरुवातीला WWE चे ब्रॉडकास्ट हक्क टेन स्पोर्ट कंपनीकडे होते. त्यांनी झी सिनेमा या वाहिनीवर ‘WWE के महाबली’, ‘अॅक्शनमेनिया’ आणि ‘रॉ धमाल’ असे तीन प्रयोग वेळोवेळी केले होते. यामध्ये हिंदी कॉमेंट्रीसह WWEचे काही भाग दाखवले जायचे. परंतु या एपिसोडची टाईमलाईन व्यवस्थित नसल्यामुळे प्रेक्षकांचा फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. परंतु सोनी वाहिनीने मात्र ती चूक न करता मुख्य टाईमलाईनसह WWE प्रदर्शित केल्यामुळे त्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.