अंडरटेकर, केन, जॉन सिना, बटिस्टा, रॉक ही सर्व नावं तुम्ही ऐकली असतील. आपल्यापैकी अनेकांचं बालपण या खेळाडूंनी व्यापून टाकलं होतं. ‘WWE’ चे सामने बघितले नाहीत असे फार कमी तरुण भारतात सापडतील. काळानुरुप या स्पर्धेत आता चांगलाच बदल झाला आहे. येत्या काही महिन्यांमध्येच ‘WWE’ हा शो भारतात येत असल्याचं कळतंय. ‘WWE’ चा कार्यकारी उपाध्यक्ष पॉल लेवेस्क्यू म्हणजेच ट्रिपल एच नुकताच भारतात दाखल झाला. आपल्या भारतभेटीची काही खास क्षणचित्र पॉलने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ८ आणि ९ डिसेंबरला नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये ‘WWE’ चे सामने रंगणार आहेत.

मुंबई विमानतळावर आगमन झाल्यानंतर चाहत्यांनी ट्रिपल एचला गराडा घातला आणि त्यासोबत सेल्फीही काढल्या. या स्वागताने भारावलेल्या ट्रिपल एचने या सेलिब्रेशनचे काही खास फोटो आणि व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकले आहेत.

भारतीय चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी गेल्या काही वर्षांत WWE ने आपल्या सामन्यांचं हिंदीतून समालोचन सुरु केलं आहे. याआधीही दिल्ली, मुंबई आणि बंगळुरुसारख्या शहरात ‘WWE’चे इव्हेंट झाले आहेत. ‘WWE’ भारतात ‘Smackdown’ आणि ‘Raw’ हे इव्हेंट घेणार आहे. यात जिंदर महाल, रोमन रेगिन्स, ब्रॉन स्ट्रोमॅन, सेथ रोलिन्स द मिझ यासारखे खेळाडू सहभाग नोंदवणार आहेत.