रेसलिंग जगातील दोन मोठे स्टार एकमेकांचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत. २० नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेप्रमाणे पहाटे ३.३० वाजता ‘डब्ल्यू डब्ल्यू ई सरव्हायवल सिरीज २०१६’ मध्ये दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर येतील. आतापर्यंत या दोघांची लढाई आपण व्हिडीओ गेम मध्ये पाहात होतो. पण ही फॅंटसी सत्यात उतरवण्याचा निर्णय ‘डब्ल्यूडब्ल्यूई’ व्यवस्थापनाने घेतला. या लढाईची प्रेक्षकांना उत्कंठा आहे. ‘डब्ल्यूडब्ल्यूई’ने वातावरण निर्मिती करुन मॅचची घोषणा केली आणि त्याचा सकारात्मक प्रतिसाद सोशल नेटवर्कींग साईडवर पाहायला मिळत आहे.

दोन्ही खेळाडू याआधी फक्त एकदाच ‘रेसलमेनिया २०’मध्ये एकमेकांविरुद्ध खेळले होते. परंतु तो सामना वादग्रस्त आणि अनिर्णीत ठरला. त्यानंतर तब्बल १२ वर्षानंतर हे दोघे एकमेकांसमोर खेळणार आहेत.

सामन्याचे महत्त्व?
गोल्डबर्ग आणि ब्रॉक लेसनर हे दोन्ही खेळाडू ‘डब्ल्यूडब्ल्यूई’च्या इतिहासातील मोठे खेळाडू आहेत. किंबहूना ‘डब्ल्यूडब्ल्यूई’ ला प्रसिद्धीच्या शिखरापर्यंत पोहचवण्यात या दोघांचा सिंहाचा वाटा आहे. दोन्ही खेळाडूंची खेळण्याची शैली सारखीच आहे. दोन्ही खेळाडू तेवढेच आक्रमक आणि हिंस्र आहेत. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या खेळाडूंनी यापूर्वी दोघांना पराभूत केले आहे. एकंदरीत दोघेही समान अनुभव आणि ताकदीचे आहेत.
दुर्दैवाने दोघांना एकमेकांविरुद्ध हात आजमवण्याची संधी कधी मिळाली नाही. १२ वर्षांपूर्वी तसा योग जुळून आला होता, पण हा आपला करिअरचा शेवटचा काळ आहे असे गोल्डबर्गने घोषित केले. प्रेक्षकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. त्यानंतर दोघांमधील उत्कृष्ट खेळाडू कोण हा प्रश्न निर्माण झाला पण हा पेच लवकरच सोडवला जाईल अशी अपेक्षा आहे. कारण ‘डब्ल्यूडब्ल्यूई’ मधले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही खेळाडू सज्ज आहेत. या अनुशंगाने सामन्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

कोणाचे पारडे जड?
गोल्डबर्ग हा रानटी आणि हिंस्र असला तरी तो ४९ वर्षांचा आहे. त्यामुळे त्याच्या वयाचा परिणाम त्याच्या खेळावर होऊ शकतो. तुलनात्मक दृष्ट्या ब्रॉक लेसनर वय ३९ वर्षांचा आहे आणि मुख्य म्हणजे तो चांगल्या फॉर्मात आहे.
गोल्डबर्ग शेवटचा सामना १२ वर्षांपूर्वी खेळला होता. पुनरागमन झाल्यानंतर एक दोन फाईट तो खेळला आहे. पण त्याला पूर्वीच्या गोल्डबर्गची धार नव्हती. तर ब्रॉक लेसनर दरम्यानच्या काळात बरेच सामने खेळला आहे. विशेष म्हणजे पुनरागमनानंतर दुसऱ्याच सामन्यात ‘द अंडरटेकर’ला पराभूत करुन त्याचा २१-० चा रेकॉर्ड मोडीत काढला आणि २१-१ असा नवीन विक्रम प्रस्थापित केला. त्यानंतर अनुक्रमे ट्रीपल एच, जॉन सीना, सी. एम. पंक, रोमन रेझ, आणि नुकतेच रेंडी ऑरटनला पराभूत करुन ‘डब्ल्यूडब्ल्यूई’ मध्ये आपली दहशद निर्माण केली आहे.
तुलमात्मकदृष्ट्या सध्या तरी ब्रॉक लेसनर गोल्ड बर्ग याच्यावर वरचढ ठरताना दिसत आहे. पण गोल्डबर्ग देखील सहजरित्या हार मानणारा खेळाडू नसून शेवटच्या क्षणापर्यंत सामना झुंजत ठेवण्याची त्याची क्षमीता आहे. शिवाय त्याचा अनुभव आणि प्रेक्षकांची साथ त्याला लाभदायक ठरु शकते. एकंदरीत सामन्यात काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.