महिला टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने शेवटच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाला ४८ धावांनी पराभूत केले. उपकर्णधार स्मृती मानधना हिने अप्रतिम फलंदाजी करत ८३ धावा ठोकल्या तर कर्णधार हरमनप्रीत कौरने तडाखेबाज ४३ धावा केल्या. १६८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ ९ बाद ११९ धावांपर्यंतच मजल मारू शकला.

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ आणि ऑस्ट्रेलियाची कर्णधार मॅग लॅनिंग्स हिच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सामन्यादरम्यान षटकांची गती नियमापेक्षा कमी राखल्याने कर्णधार लॅनिंग्स हिच्या सामन्याच्या मानधनातील २० टक्के रक्कम आणि इतर खेळाडूंच्या मानधनातील १० टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावण्यात आला आहे. सामन्यातील पंच ग्रेगरी ब्रेथवेट, वेन नाईट्स, तिसरे पंच स्यू रेडफर्न आणि चौथे पंच शॉन यांनी एकत्रित हा निर्णय घेतला आणि सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी हा दंड ठोठावला. तसेच, पुढील वर्षभरात असे पुन्हा घडल्यास कर्णधार लॅनिंग्स हिला १ सामन्याच्या निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय भारताची सलामीवीर स्मृती मानधना हिने सार्थ ठरवला. तिने ५५ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८३ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीतने देखील पदाला साजेशी खेळी केली. तिने २७ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकार खेचत ४३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून एलिस पेरीने सर्वाधिक ३ बळी टिपले.

ऑस्ट्रेलियाला भारताने दिलेले १६८ धावांचे आव्हान पेलता आले नाही. त्यांनी सर्वबाद (९) ११९ धावा केल्या. मुनी, गार्डनर, अनुभवी लँनिंग आणि एलिस पेरी यांच्याशिवाय इतर कोणालाही २ अंकी धावसंख्या करता आली नाही. एलिस पेरीने सर्वाधिक नाबाद ३६ धावा केल्या. भारताकडून दीप्ती शर्मा, पूनम आणि राधा यादव या तिघींनी २-२ बळी बाद केले.