ICC Women’s World T20 – भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा आपल्या कारकिर्दीतील एक धडाकेबाज आणि स्फोटक फलंदाज होता. सुरुवातीच्या षटकात गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून त्याची ख्याती होती. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, विंडीज यासारख्या संघाच्या वेगवान गोलंदाजांना त्याने चोपून काढले होते. त्यामुळे महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटच्या सामन्यात जिंकण्यासाठी सेहवागने एक कानमंत्र दिला आहे.

महिला विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने ५२ धावांनी विजय मिळवला आणि स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. अनुभवी मिताली राजने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने आयर्लंडपुढे १४६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ केवळ ९३ धावाच करू शकला आणि त्या बदल्यात त्यांनी ८ गडी गमावले.

भारताने उपांत्य फेरीत धडक मारल्याबद्दल भारतीय महिला संघाचे अभिनंदन. तुम्ही अत्यंत उत्तम कामगिरी केलीत आणि स्पर्धेची उपांत्य फेरी गाठलीत. तुम्हाला उर्वरित स्पर्धेसाठी शुभेच्छा, असे सेहवागने ट्विट केले आहे. पण त्या बरोबरच त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या आगामी सामन्याआधी महिला संघाला कानमंत्र दिला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून तुम्ही गुणतक्त्यात अव्वल क्रमांक कायम राखा, असा कानमंत्र त्याने महिला संघाला दिला आहे.

 

दरम्यान, नाणेफेक जिंकून आयर्लंडच्या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताकडून अनुभवी सलामीवीर मिताली राज आणि स्मृती मानधना यांनी ६७ धावांची सलामी दिली. पण ३३ धावांवर स्मृतीला तंबूत परतावे लागले. त्यानंतर मितालीने एकाकी झुंज सुरू ठेवली, पण तिला अपेक्षित साथ मिळू शकली नाही. रोड्रीग्जच्या १८ आणि दीप्ती शर्माच्या ११ धावा केल्या. मात्र मितालीने आपला अनुभव पणाला लावून भारताला १४५ धावांपर्यंत पोहोचवले.

या आव्हानाचा पाठलाग करत असताना आयर्लंडच्या संघाला मोठ्या भागीदारी करता आल्या नाहीत. सलामीवीर लेव्हीस ९ धावांवर बाद झाली. शिलिंगटन हिने २३ धावा करून आयर्लंडच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण तीदेखील तंबूत परतली. जॉयस हिने डावाला चांगली सुरुवात केली होती, मात्र तीदेखील ३३ धावांवर बाद झाली. त्यानंतर मात्र आयर्लंडचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला.