नौरोसजी वाडियाची खेळाडू यशोधरा शेरेकरने येथे जाएंट स्टारकेन चषक राष्ट्रीय एमटीबी सायकलिंग स्पर्धेतील मुलींच्या मास स्टार्ट प्रकारामध्ये सुवर्णपदक जिंकले. तिचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. तिची सहकारी ऋतुजा सातपुतेने रौप्यपदकाची कमाई केली.
ऑक्सफर्ड गोल्फ क्लब परिसरात आयोजित केलेल्या या स्पर्धेत यशोधराने शनिवारी टाइम ट्रायलमध्ये सोनेरी यश मिळवले होते. तिने रविवारी चार फेऱ्यांच्या मास स्टार्ट विभागातही अव्वल कामगिरी केली. पुण्याचीच आंतरराष्ट्रीय स्पर्धक ऋतुजा सातपुते हिने महिलांच्या टाइमट्रायलमध्ये रुपेरी कामगिरी केली. केरळच्या एस. लिदियामोलने तिला मागे टाकीत सुवर्णपदक मिळविले. या प्रकारात यशोधरा हिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. युवा मुलींच्या टाइमट्रायलमध्ये महाराष्ट्राच्या मानसी कमलाकरला कांस्यपदक मिळाले. कर्नाटकच्या अनिता शिंदे व दानम्मा गुरव यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक मिळविले. महाराष्ट्राच्या प्रियांका जाधव व गायत्री सुसरे यांना अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान मिळाले. मुलांच्या सबज्युनिअर विभागात महाराष्ट्राच्या संकल्प थोरात व विवेक वाईकर यांना टाइमट्रायलमध्ये अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळाला.