News Flash

ये हैं मुंबै मेरी शान!

रणजी करंडक स्पध्रेवरील मुंबईची मक्तेदारी अद्याप कायम आहे, हेच आता सिद्ध झाले आहे. एक-दोन नव्हे तब्बल ३९वेळा अजिंक्यपद जिंकण्याची किमया साधणाऱ्या मुंबईने ४४व्यांदा रुबाबात

| January 22, 2013 12:32 pm

मुंबई ४४व्यांदा अंतिम फेरीत
 रणजी करंडक स्पध्रेवरील मुंबईची मक्तेदारी अद्याप कायम आहे, हेच आता सिद्ध झाले आहे. एक-दोन नव्हे तब्बल ३९वेळा अजिंक्यपद जिंकण्याची किमया साधणाऱ्या मुंबईने ४४व्यांदा रुबाबात अंतिम फेरी गाठली आहे. आता मुंबईकरांच्या साक्षीने २६ ते ३० जानेवारी या कालावधीत मुंबई संघाची गाठ पडेल ती बलाढय़ सौराष्ट्रशी.
सेनादलाविरुद्धच्या सामन्याला खराब वातावरणाचा फटका बसल्यामुळे अंतिम फेरीतील दुसरा संघ ठरण्यासाठी सहाव्या दिवसापर्यंत वाट पाहावी लागली. मुंबईने सेनादलाचा पहिला डाव फक्त २४० धावांत गुंडाळून २१४ धावांची मोठी आघाडी घेतली आणि अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
मुंबईचा संघ सोमवारी ‘चॅम्पियन’च्या थाटातच खेळला. रविवारच्या ३ बाद १६४ या धावसंख्येवरून सेनादलाने आपल्या डावाला सोमवारी पुढे प्रारंभ केला. सौम्या स्वान आणि यशपाल सिंग यांनी संघाला १८६ धावांपर्यंत रेटले. पण त्यानंतर सेनादलाचा डाव कोसळला. फक्त २७ षटकांत आणि ५४ धावांत सेनादलाचे उर्वरित सात फलंदाज बाद झाले.
वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने टिच्चून गोलंदाजी करीत ३३ धावांत ५ बळी घेतले. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने यशपालचा (५८) अडसर दूर केला. यष्टीरक्षक आदित्य तरेने त्याचा झेल घेतला. स्वानने ८ चौकारांसह सर्वाधिक ७४ धावा काढल्या.
डावखुरा फिरकी गोलंदाज विशाल दाभोळकरच्या गोलंदाजीवर पहिल्या स्लिपमध्ये वासिम जाफरने त्याचा झेल टिपला. त्यामुळे सेनादलाची ६ बाद १९५ अशी अवस्था झाली. उर्वरित काम मग धवल कुलकर्णीने चोख बजावले.
‘‘अखेर सामन्याचा निकाल लागला, त्यामुळे आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला. नाणेफेक उडवून हा निकाल लागला नाही, हे बरे झाले,’’ असे मत मुंबईचा कप्तान अजित आगरकरने सामन्यानंतर व्यक्त केले.
वेगवान गोलंदाज झहीर खान अंतिम सामन्यासाठी उपलब्ध आहे का, याविषयी आगरकरला माहिती नाही. तो पुढे म्हणाला, ‘‘रोहित शर्मा भारतीय संघात आहे. अखेरच्या दोन सामन्यांसाठी रोहितचा संघात समावेश असल्यामुळे त्याला मुंबईसाठी भारतीय संघ व्यवस्थापन उपलब्ध करून देणार नाही.’’
‘‘चेतेश्वर पुजारासुद्धा अंतिम सामन्यासाठी सौराष्ट्रकरिता उपलब्ध नसेल. परंतु त्यामुळे त्यांचा संघ दुय्यम नक्कीच ठरणार नाही. पुजाराच्या अनुपस्थितीत सौराष्ट्रने पंजाबसारख्या संघाला नमविण्याची किमया साधली आहे. हेच त्यांचे कर्तृत्व आहे,’’ असे आगरकर म्हणाला.
आगरकर याआधी सहा वेळा मुंबईच्या रणजी विजेत्या संघात सामील होता. २००९-१०मध्ये मुंबईने कर्नाटकला फक्त सहा धावांनी हरविले होते. याविषयी आगरकर शांतपणे हसला आणि म्हणाला, ‘‘सौराष्ट्रविरुद्धचा अंतिम सामना त्या लढतीइतका रंगतदार होणार नाही, अशी मी आशा बाळगतो.’’
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ८ बाद ४५४ धाव घोषित
सेनादल (पहिला डाव) : ९१.४ षटकांत सर्व बाद २४० (सौम्या स्वान ७४, यशपाल सिंग ५८; धवल कुलकर्णी ५/३३)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 12:32 pm

Web Title: ye hai mumbai meri jaan mumbai is in final
टॅग : Sports
Next Stories
1 भारतास नावलौकिक मिळण्यासाठी हॉकी इंडिया लीग उपयुक्त – सरदारासिंग
2 सोकोलोवने आनंदला बरोबरीत रोखले
3 वातावरणाचा फायदा घेऊन मालिकेत बरोबरी करू – बेल
Just Now!
X