पत्नी हसनी जहाँने केलेल्या आरोपांप्रकरणी बीसीसीआयने मोहम्मद शमीच्या फेब्रुवारी महिन्यातील भटकतींचा तपशील कोलकाता पोलिसांना दिला आहे. मोहम्मद शमी, फेब्रुवारी महिन्यात दोन दिवसांसाठी दुबईत गेला होता असं बीसीसीआयने कोलकाता पोलिसांना कळवलं आहे. १७-१८ फेब्रुवारीदरम्यान शमी दुबईत असल्याचं पत्र आपल्याला मिळालं असून याआधारावर पुढचा तपास केला जाणार असल्याचं कोलकाता पोलिसांचे सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) प्रवीण त्रिपाठी यांनी स्पष्ट केलं आहे.

फेब्रुवारी महिन्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळत होता. मात्र मोहम्मद शमीचा या मालिकेसाठी भारतीय संघात समावेश झालेला नव्हता. मात्र दोन दिवस शमी दुबईत बीसीसीआयच्या पैशांवर फिरत होता का याचा तपास पोलिसांना अद्यापही लावता आलेला नाहीये. कोलकाता पोलिसांचं एक पथक, शमीची पत्नी हसीन जहाँने आरोप केल्यानंतर उत्तर प्रदेशात तपास करत आहे. हसीन जहाँने शमीच्या परिवारावर लावलेले सर्व आरोप कोलकाता पोलिस पडताळून पाहत आहेत.

दरम्यान या प्रकरणी कोलकाता पोलिसांनी, सोमवारी हसीन जहाँचा अलिपूर दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवून घेतला. मोहम्मद शमीचे इतर तरुणींसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप हसीन जहाँने केला होता. आपल्या आरोपांची पुष्टी करण्यासाठी हसीन जहाँने शमी आणि मुलींमधल्या संभाषणाचे स्क्रिनशॉट आपल्या फेसबूक अकाऊंटवर टाकले होते. याचसोबत शमीने अलिश्बा नावाच्या पाकिस्तानी तरुणीकडून मॅचफिक्सींगचे पैसे स्विकारल्याचंही हसीन जहाँचं म्हणणं होतं. मात्र हे प्रकरण सामोर आल्यानंतर अलिश्बाने प्रसारमाध्यमांसमोर येत आपण शमीला भेटल्याचं कबुल केलं. मात्र या भेटीत आपल्यात कोणताही आर्थिक व्यवहार झाला नसल्याचं अलिश्बाने म्हटलं आहे.

अवश्यक वाचा – मोहम्मद शमीला दुबईमध्ये भेटल्याची पाकिस्तानी महिलेने दिली कबुली