भारताचा माजी क्रिकेटपटू व सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी ओळख असलेल्या मोहम्मद कैफने, यो-यो फिटनेस टेस्ट हा संघनिवडीसाठी एकमेव निकष नसावा असं मत व्यक्त केलं आहे. काही महिन्यांपूर्वी बीसीसीआयने भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी खेळाडूंना यो-यो फिटनेस टेस्ट पास होणं बंधनकारक केलं होतं. किमान १६.१ गुण मिळवणाऱ्या खेळाडूचीच संघात निवड करण्यात येते. अनेकांना ही टेस्ट पास न करता आल्यामुळे त्यांना संघातली आपली जागा गमवावी लागली होती. भारताच्या इंग्लंड दौऱ्यात अंबाती रायुडूला आपली जागा गमवावी लागली होती, मात्र विंडीज दौऱ्यात रायुडूने चांगलं पुनरागमन केलं. कैफच्या मते, यो-यो फिटनेस चाचणीसोबतच संघनिवडीसाठी एक समोतल मार्गाचा विचार करणं गरजेचं आहे.

“प्रत्येक खेळाडूचा फिटनेस हा महत्वाचा आहेच, गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय संघाचं क्षेत्ररक्षणही सुधारलं आहे. मात्र यो-यो चाचणीव्यतिरीक्त एका समतोल मार्गाचा विचार करणं गरजेचं आहे. जर खेळाडू चांगली फलंदाजी करत असेल किंवा त्याच्याकडे विकेट घेण्याची क्षमता आहे, मात्र फिटनेस चाचणीत तो नापास झाला म्हणून त्याला संघात जागा न मिळणं ही गोष्ट योग्य वाटत नाही.” भुवनेश्वरमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना कैफने आपलं मत व्यक्त केलं.

अवश्य वाचा – विराट कोहली कसोटी क्रिकेट जिवंत ठेऊ शकतो – ग्रॅम स्मिथ

विंडीजविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या वन-डे मालिकेत काही सामन्यांमध्ये ऋषभ पंतला यष्टीरक्षणाऐवजी क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात उतरवलं गेलं. भारतीय संघाच्या या निर्णयावरही कैफने आश्चर्य व्यक्त केलं आहे. ऋषभ हा यष्टीरक्षक आहे, मात्र त्याला गेल्या सामन्यांमध्ये कोणत्याही जागेवर क्षेत्ररक्षणासाठी उभं केलं गेलं. हा निर्णय कोणत्याही दृष्टीकोनातून योग्य वाटत नाही. कर्णधार विराट कोहलीने फलंदाजीसोबत क्षेत्ररक्षणातही आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. याचा आदर्श ठेवत भारताचे इतर फलंदाजही त्याचा आदर्श ठेवून आपली कामगिरी सुधारत असल्याचं कैफ म्हणाला.