भारतातील ख्यातनाम कुस्तीपटू योगेश्वर दत्त कुस्तीच्या आखाड्यात प्रतिस्पर्धी खेळाडूंना धोबीपछाड करत असला तरी आता त्याने हुंड्याविरोधात दंड थोपटले आहे. योगेश्वरने हुंडा म्हणून फक्त एक रुपया स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार योगेश्वर दत्त १६ जानेवारी रोजी विवाहबद्ध होणार आहे. हरयाणामधील काँग्रेस नेते जयभगवान शर्मा यांची कन्या शीतलसोबत योगेश्वरचे लग्न होणार आहे. लग्नात योगेश्वरने हुंडा म्हणून फक्त एक रुपये स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना योगेश्वर म्हणाला, मी आमच्या कुटुंबातील मुलींच्या लग्नात हुंडा देताना होणारा त्रास बघितला आहे. मी दोन गोष्टींचा निर्धार केला होता. एक म्हणजे कुस्ती खेळण्याचा आणि दुसरा म्हणजे हुंडा न स्वीकारण्याचा. या दोन्ही गोष्टी आता पूर्ण झाल्या आहेत असे योगेश्वरने सांगितले.  योगेश्वरच्या लग्नाबद्दल त्याची आई आनंदात आहे. योगेश्वरची आई सुशिला देवी यांनी मुलाच्या निर्णयाशी सहमती दर्शवली. आम्ही शूभ शकून म्हणून वधूच्या कुटुंबीयाकडून एक रुपया स्वीकारणार आहोत असे त्यांनी सांगितले. या आनंदाच्या क्षणी मी वडील राममेहर दत्त आणि गुरु सतबिर सिंग हे दोघेही हवे होते असे त्याने म्हटले आहे.

योगेश्वरमधील या दिलदार वृत्तीचा अनुभव यापूर्वीही आला आहे. २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वरने कांस्य पदक पटकावले होते. या लढतीत रौप्य पदक मिळवलेल्या रशियन कुस्तीपटूची उत्तेजक चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याचे हे पदक योगेश्वरला मिळणार होते. त्यामुळे सर्वांनी योगेश्वरचे कौतुक देखील केले मात्र, योगेश्वरने आपण रौप्यपदक नाकारत असल्याचे जाहीर केले होते. कुदुखोवचा २०१३ साली वयाच्या २७ व्या वर्षी रशियामध्ये अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे कुदुखोवच्या कुटुंबियांकडेच रौप्यपदक असावे, त्यांच्याकडून रौप्यपदक घेण्याची माझी अजिबात इच्छा नाही, असे योगेश्वरने म्हटले होते.