जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टच्या निवृत्तीनंतर त्याचा वारसदार म्हणून जमैकाच्याच योहान ब्लॅककडे अपेक्षेने पाहिले जात होते. योहानला प्रोत्साहन देण्यासाठी खुद्द बोल्ट गोल्ड कोस्ट येथे प्रेक्षकांमध्ये बसला होता. मात्र, १०० मीटर शर्यतीत जे घडले ते योहानसह बोल्टलाही अपेक्षित नव्हते. कुणाच्याही ध्यानी मनी नसताना दक्षिण आफ्रिकेच्या अकानी सिम्बीन (१०.०३ से.) आणि हेन्रिको ब्रुईन्टजीस (१०.१७ से. ) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. जेतेपदाचा दावेदार असलेला योहानला (१०.१९ से.) कांस्यवर समाधान मानावे लागले.