आयपीएल स्पॉट फिक्सींग प्रकरणात तुरुंगाची हवा खाऊन आलेला भारताचा माजी खेळाडू श्रीशांत आणि बीसीसीआय यांच्यात आता नवीन वादाची ठिणगी पडताना दिसत आहे. बीसीसीआयने श्रीशांतवर लादलेली आजीवन बंदी केरळच्या उच्च न्यायालयाने उठवली. मात्र बीसीसीआय आता केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत आहे. मात्र बीसीसीआयच्या या भूमिकेवर श्रीशांतने आपली तीव्र नाराजी व्यक्त करत बीसीसीआयला, तुम्ही देव नाही आहात, मी माझा हक्क मागत असल्याचं ट्वीट केलं आहे.

 

न्यायालयाने निर्दोष म्हणून सोडून दिलेल्या खेळाडूला तुम्ही अशी वागणूक नाही देऊ शकत, असं म्हणत श्रीशांतने बीसीसीआयच्या भूमिकेवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. २०१३ साली क्रिकेटविश्वाला हादरवुन सोडणाऱ्या आयपीएल स्पॉट फिक्सींग प्रकरणात श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडेला या राजस्थान रॉयल्सच्या ३ खेळाडूंना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात तिघांना तुरुंगाची हवाही खायला लागली होती. मात्र त्यानंतर तिन्ही खेळाडूंना जामीनावर सोडण्यात आलं होतं.

अवश्य वाचा – .. तिच्यामुळेच श्रीशांतने बदलला आत्महत्येचा विचार

आता केरळच्या उच्च न्यायालयाने श्रीशांतवरील बंदी उठवली असली, तरीही बीसीसीआय मात्र आपल्या भूमिकेवरुन मागे हटायला तयार नाहीये. त्यामुळे श्रीशांतला या प्रकरणी इतक्या लवकर दिलासा मिळेल अशी शक्यता कमीच आहे. श्रीशांतने याआधी २७ कसोटी, ५३ वन-डे आणि १० टी-२० सामन्यात भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यामुळे येत्या काळात सर्वोच्च न्यायालय केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयावर काय निकाल देतं हे पहावं लागणार आहे.

अवश्य वाचा – एस. श्रीशांतला दिलासा, हायकोर्टाने बंदी उठवली