सध्या सर्व भारतीय खेळाडू युएईत आयपीएलच्या तेराव्या हंगामाची तयारी करत आहेत. १९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार असून गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी या सामन्यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. संघातला भरवशाचा खेळाडू सूर्यकुमार यादवने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. १४ ऑक्टोबर हा सूर्यकुमार यादव आणि मुंबई इंडियन्सचे सहाय्यक प्रशिक्षक रॉबिन सिंग यांचा वाढदिवस असतो.

यावेळी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी खास केकची व्यवस्था करत दोघांचाही वाढदिवस साजरा केला. यावेळी सूर्यकुमार यादवला शुभेच्छा देताना कर्णधार रोहित शर्माने असाच खेळत राहा, भारतीय संघात संधी मिळण्यापासून फार दूर नाहीयेस अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत.

सूर्यकुमार मागील दोन हंगाम मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. सूर्यकुमारने २०१८ च्या आयपीएलमध्ये १३३.३३ चा स्ट्राईक रेट आणि ३६.५७ च्या सरासरीने ५१२ धावा केल्या आहेत, तर २०१९ च्या आयपीएलमध्ये १३०.८६ च्या स्ट्राईक रेटने आणि ३२.६१ च्या सरासरीने ४२४ धावा केल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात सूर्यकुमार यादव कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.