दुसऱ्या वन-डे सामन्यात महेंद्रसिंह धोनीने गरजेच्या वेळी अर्धशतकी खेळी करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या खेळीनंतर महेंद्रसिंह धोनीवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनीही धोनीचं संघात असणं अत्यंत गरजेचं असून, त्याचं महत्व आपल्याला कशातही मोजता येणार नाही असं म्हणत धोनीचं कौतुक केलं आहे.

“माझी सर्वांना विनंती आहे की धोनीला त्याच्या मनासारखं खेळू द्या, त्याला वेळ द्या. त्याचं वय झालंय, त्यामुळे याआधी तो ज्या तडफेने खेळत होता तसा खेळ कदाचीत त्याच्याकडून होणार नाही. कदाचीत या गोष्टीचा संघाला फटकाही बसेल, मात्र धोनीचं संघातलं महत्व कशातही मोजता येणार नाही.” गावसकर India Today वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

आजही धोनी यष्टींमागून गोलंदाजांना सुचना देत असतो, फलंदाज कुठला फटका खेळणार आहे याचा अंदाज धोनीला बरोबर येतो. फलंदाजांच्या मनात काय सुरु आहे याचा अंदाज तो बरोबर मांडतो. कोणत्या क्षणाला कोणता क्षेत्ररक्षक कुठे ठेवायचा आहे यासाठी विराटला सल्ला देणं, त्यामुळे धोनीचं संघात असणं हे भारतीय संघासाठी अत्यंत गरजेचं असल्याचं गावसकर म्हणाले.