दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आणि वन-डे क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाची परिभाषा बदलणाऱ्या जॉन्टी ऱ्होड्सला आज वाढदिवस आहे. क्षेत्ररक्षणातला चित्ता अशी ओळख असलेल्या जॉन्टीने आज वयाच्या ४९ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. जगभरातून आज जॉन्टीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने जॉन्टीला दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

क्रिकेटमध्ये तू क्षेत्ररक्षणाला वेगळी ओळख मिळवून दिलीसच पण जो दर्जा तू तयार केला आहेस तसं क्षेत्ररक्षण आजही कोणाला करता येत नाही. अशा आशयाचं ट्विट करुन सचिनने जॉन्टीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये सचिनने जॉन्टीचा हवेत झेपावत पकडलेल्या कॅचचा फोटोही शेअर केला आहे.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही जॉन्टी ऱ्होड्स आणि भारताचं नात अतुट राहिलं आहे. आयपीएलमध्येही जॉन्टी ऱ्होड्स मुंबई इंडियन्स संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहत होता. याचसोबत जॉन्टीच्या एका मुलीचा जन्म हा भारतात झाला असून, जॉन्टीने भारतासोबत नातं अधोरेखित करण्यासाठी आपल्या मुलीचं नाव इंडिया असं ठेवलं आहे.