सध्या संपूर्ण देशात जळीस्थळी काष्ठी पाषाणी एकाच विषयावर चर्चा होत आहे, तो म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना. मात्र, या सगळ्या ओघात कालच्या सामन्यातील समालोचनादरम्यान भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यात रंगलेल्या जुगलबंदीकडे अनेकांचे दुर्लक्ष झाले. हा सामना सुरू असताना चर्चेचा ओघ एकेरी, दुहेरी आणि चोरट्या धावा काढण्याच्या कौशल्याकडे वळला. त्यावेळी सौरव गांगुलीने विराट कोहलीचे कौतुक केले. यावर सेहवागने तत्त्परतेने, माझा एक माजी सहकारी याबाबत खूपच गुणवान होता, असे म्हणत सौरव गांगुलीला डिवचले. त्यावेळी गांगुलीने लगेच, होय, मी खूप वेगाने धाव काढायचो, असे सांगून सेहवागला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऐकेल तो सेहवाग कसला. त्याने थेट गांगुली आणि विराटच्या ‘रनिंग बिटविन द विकेट’ची तुलना करायला सुरूवात केली. त्यावेळी गांगुलीने सेहवागला थेट आपल्याशी धावण्याची स्पर्धा करायचे आव्हान केले. जो कोणी हा सामना पाहत असेल त्या सर्वांसमक्ष मी वीरूला आव्हान देत आहे. हा सामना संपल्यानंतर ओव्हल मैदानावरच १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी आपण भेटू, असे गांगुलीने म्हटले. त्यावर सेहवागने, दादा तुला या शर्यतीत पहिले यावे लागेल, असे खोडकरपणे म्हटले. तेव्हा गांगुलीने मी ते सहजपणे करेन आणि तुला सावरण्यासाठी दोन फिजिओही देईन, असे म्हटले. तू भारतीय संघातील आजी-माजी खेळाडूंबद्दल जे गैरसमज पसरवतोस ते दूर करण्यासाठी मला प्रेक्षकांना काही आकडे दाखवायचे आहेत, असे गांगुलीने सांगितले.

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी सेहवागचा अर्ज ट्विटपेक्षाही लहान!

त्यानंतर गांगुलीने खरोखरच जुनी आकडेवारी काढत ‘रनिंग बिटविन द विकेट’च्या बाबतीत आपण सेहवागपेक्षा सरस असल्याचे म्हटले. या आकडेवारीनुसार सौरव गांगुलीचे एकेरी धावा काढण्याचे प्रमाण ३६ टक्के तर सेहवागचे प्रमाण २४ टक्के इतके निघाले. हाच दाखला देत सौरव गांगुलीने तरीही तू माझ्यावर टीका करतोस, असे सेहवागला उद्देशून म्हटले. एकेरीची दुहेरी, दुहेरीची तिहेरी आणि तीनच्या चार धावा काढताना धावचीत न होणे, हेच ‘रनिंग बिटविन द विकेट’चे वैशिष्ट्य असल्याचेही दादाने सांगितले. यावर सेहवागने म्हटले की, दादा तू सादर केलेली आकडेवारी ही फक्त तुझ्या एकेरी धावांची आहे. तू एकेरी धावेचे दुहेरी किंवा तिहेरीमध्ये रूपांतर करू शकत नव्हतास. तुला एकेरी धाव काढण्यात काहीच समस्या नव्हती. तू फाईन-लेग, थर्डमॅन, डिप-पॉईंट किंवा लाँग ऑनला चेंडू टोलावून सहजपणे एक धाव काढायचास, असे सेहवागने सांगितले. तेव्हा गांगुलीने लगेच, तुला अजूनही भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी माझ्यासमोर मुलाखत द्यायची आहे, हे लक्षात ठेव अशी प्रेमळ धमकी दिली. त्यासाठी तू स्वत:चे आकडेवारीचे ज्ञान तपासून पाहायला पाहिजेस. जेणेकरून तू इतरांबद्दल काहीही बरळणार नाहीस. शेवटी एक लक्षात ठेव की, तुझा इंटरव्ह्यू मीच घेणार आहे, असे गांगुलीने म्हटले. त्यानंतर सेहवागने विषय हसण्यावारी नेत पुढे काहीही बोलायचे टाळले. विशेष म्हणजे सेहवाग-गांगुलीच्या या सर्व संभाषणादरम्यान त्यांचे समालोचक सहकारी साबा करीम यांनी तोंडातून एकही शब्द काढला नाही. त्यानंतर मी चॅम्पियन्स ट्रॉफी संपल्यानंतर सेहवाग आणि गांगुलीची शर्यत पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगत वातावरण थंड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावरूनही गांगुलीने साबा करीमची फिरकी घेतली. तुम्ही गेली सहा-सात वर्षे हेच केले. तुम्ही फक्त खेळाडू निवडलेत आणि स्टॉपवॉच लावून बसलात, असे गांगुलीने म्हटले.

कुंबळेशी अॅडजस्ट करून घे!; कोहलीला बीसीसीआयचा सल्ला