रणजी करंडक स्पर्धेत केरळ संघाकडून खेळताना यंदाच्या हंगामात लागोपाठ सामन्यांमध्ये केलेलं शतक, युवा खेळाडू संजू सॅमसनसाठी फायदेशीर ठरणार असल्याची चिन्ह आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, श्रीलंकेविरुद्ध आगामी वन-डे आणि टी-२० मालिकेसाठी निवड समिती संजू सॅमसनच्या नावाचा विचार करु शकते. याचसोबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या हंगामात धावांचा रतीब घालणाऱ्या मुंबईच्या पृथ्वी शॉलाही संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

अवश्य वाचा – खेळापेक्षा खेळाडू श्रेष्ठ नाही, धोनीने योग्य वेळीच पायउतार व्हावं; संजय मांजरेकरांचं टीकास्त्र

बीसीसीआयच्या निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या प्रतिक्रियेत संजू सॅमसनच्या खेळाचं कौतुक केलं. मात्र संजूला संघात जागा मिळेल की नाही या प्रश्नावर प्रसाद यांनी मौन बाळगलं. “आतापर्यंतच्या हंगामात संजू सॅमसनची कामगिरी खरंच आश्वासक आहे. त्याच्या खेळात बऱ्यात प्रमाणात सातत्य आहे. त्यामुळे संजू सॅमसनची चांगली खेळी ही आमच्यासाठी चांगली बाब आहे. त्यामुळे आगामी काळात संघ निवडीच्या वेळी आम्हाला अधिक पर्यायांचा विचार करता येईल.”

अवश्य वाचा – निवृत्तीचा यक्षप्रश्न!

श्रीलंकेचा दौरा संपल्यानंतर भारताचा संघ जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याआधी निवड समिती भारतीय संघात नवोदितांना संधी देण्याच्या प्रयत्नात आहे. कोलकाता कसोटी सुरु होण्याआधी विराट कोहलीनेही आपल्याला विश्रांतीची गरज असल्याचं बोलून दाखवलं होतं. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत संघातील महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्यात येईल, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत संजू सॅमसनला भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी मिळू शकते. महेंद्रसिंह धोनीवर निवृत्तीसाठी दबाव वाढत असताना, निवड समिती संजू सॅमसन किंवा ऋषभ पंतसारख्या खेळाडूंना संधी देऊन नवीन प्रयोग करण्याच्या विचार करु शकते. याआधी २०१५ साली भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यात संजू सॅमसनने आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केलं होतं. या दौऱ्यात संजू सॅमसन आपल्या कारकिर्दीतला एकमेव टी-२० सामना खेळला होता.

रणजी हंगामात सध्याच्या घडीला संजू सॅमसन ५६१ धावांसह सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. ५ डावांत संजूने ६२.३३ च्या सरासरीने दोन शतकांसह धावांचा रतीब घातला आहे. याचसोबत श्रीलंकेविरुद्ध अध्यक्षीय संघाचं नेतृत्व संजू सॅमसनकडे देण्यात आलं होतं. या सामन्यातही सॅमसनने आश्वासक फलंदाजी केली होती. त्यामुळे आगामी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संजू सॅमसन संघात पुनरागमन करतो का हे पाहावं लागणार आहे.

अवश्य वाचा – पृथ्वी शॉ सचिन तेंडुलकरच्या विक्रमापासून दोन पावले दूर