अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीतही भारताची कर्णधार हरमनप्रीतला विश्वविजेतेपदाची आस

मिताली राज, झुलन गोस्वामी यांसारख्या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंनी कामगिरी उंचावण्याची गरज असून त्यांनी जर या सुवर्णसंधीचा लाभ उचलला, तर भारत नक्कीच विश्वविजेतेपद मिळवेल, असा आशावाद भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केला. महिलांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला २१ फेब्रुवारीपासून प्रांरभ होणार आहे. विश्वचषकाच्या पहिल्याच लढतीत भारताची गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी गाठ पडणार आहे.

‘‘मिताली आणि झुलन यांची कसर भरून काढणे कोणालाही शक्य नाही. परंतु युवा खेळाडूंना हीच स्वत:चे नाव कमावण्याची उत्तम संधी आहे. विशेषत: गेल्या काही महिन्यांत युवा खेळाडूंनीच भारताला अधिकाधिक सामने जिंकवून दिले आहेत. त्यामुळे विश्वचषकातसुद्धा त्यांनी जबाबदारीने खेळ केल्यास भारताचे जगज्जेतेपदाचे स्वप्न नक्कीच साकार होऊ शकते,’’ असे ३० वर्षीय हरमनप्रीत म्हणाली.

भारताच्या सध्याच्या संघाचे सरासरी वय २२.८ वर्षे इतके असून आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या अनुभवाचा विचार केल्यास हरमनप्रीत संघाची वरिष्ठ खेळाडू ठरते. ‘‘२०१७च्या विश्वचषकाच्या वेळी मी संघातील युवा खेळाडूंपैकी एक होती. परंतु दोन वर्षांतच संघातील सर्वाधिक अनुभवी खेळाडू म्हणून माझ्यावरील जबाबदारी वाढली. मात्र संघात युवा-अनुभवी खेळाडू असा कोणताही भेदभाव नसून प्रत्येकाला त्याच्या क्षमतेची जाणीव असल्यानेच यंदा आम्ही विश्वचषकात दमदार कामगिरी करू,’’ असेही हरमनप्रीतने सांगितले.