इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामाची मुंबई इंडियन्सच्या विजयासह धडाक्यात सांगता झाली. परंतु मुंबईच्या युवा खेळाडूंना या हंगामात छाप पाडता आली नाही. त्याशिवाय महाराष्ट्राचेही ठरावीक खेळाडू सोडल्यास अनेकांच्या पदरी निराशाच पडली.

यंदाच्या हंगामात मुंबईचे १३, तर महाराष्ट्रातील सात असे एकूण २० खेळाडू विविध संघांचा भाग होते. त्यापैकी पृथ्वी शॉ, यशस्वी जैस्वाल, सर्फराज खान, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर आणि तुषार देशपांडे हे मुंबईकर खेळाडू मिळालेल्या संधीचा लाभ उचलण्यात अपयशी ठरले. रोहितने अनुभवाच्या बळावर मुंबईला जेतेपदाची दिशा दाखवली. सूर्यकुमारनेसुद्धा या यशात मोलाची भूमिका बजावली. त्याचप्रमाणे उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सच्या यशातदेखील स्थानिक पातळीवर मुंबईकडून खेळणाऱ्या कर्णधार श्रेयस अय्यरचा सिंहाचा वाटा होता. तर अजिंक्य रहाणेने बेंगळूरुविरुद्ध मोक्याच्या क्षणी अर्धशतक झळकावत दिल्लीचे बाद फेरीतील स्थान पक्के केले.

महाराष्ट्राच्या खेळाडूंचा विचार केल्यास ऋतुराज गायकवाडचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना सलग तीन अर्धशतकांसह त्याने अखेरच्या टप्प्यात छाप पाडली. परंतु अनुभवी केदार जाधवने सपशेल निराशा केली. उमेश यादवलाही छाप पाडता आली नाही. आदित्य तरे, सिद्धेश लाड, दिग्विजय देशमुख, निखिल नाईक आणि दर्शन नळकांडे या खेळाडूंना मात्र एकाही लढतीत आपापल्या संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी लाभली नाही.

महाराष्ट्रातील सर्व खेळाडूंची कामगिरी

खेळाडू  धावा   बळी

रोहित शर्मा  ३३२ –

श्रेयस अय्यर ५७९ –

सूर्यकुमार यादव  ४८० –

अजिंक्य रहाणे   ११३ –

ऋतुराज गायकवाड   २०४ –

पृथ्वी शॉ    २२८ –

शिवम दुबे  १२९ ४

केदार जाधव    ६२ –

सर्फराज खान   ३३ –

यशस्वी जैस्वाल  ४० –

राहुल त्रिपाठी २३० –

तुषार देशपांडे २१ ३

उमेश यादव ०  ०

शार्दुल ठाकूर १२ १०

धवल कुलकर्णी  –   ०

मुंबईच्या युवा खेळाडूंनी यंदा सपशेल निराशा केली. परंतु त्यातील काही खेळाडूंचा हा पहिलाच हंगाम असल्याने त्यांना फारसा दोष देता येणार नाही. महाराष्ट्रातील ऋतुराज गायकवाडच्या कामगिरीने मी प्रभावित झालो असून भविष्यात विदर्भाच्या खेळाडूंनाही ‘आयपीएल’मध्ये स्वत:चे कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

– वासिम जाफर, माजी क्रिकेटपटू