न्यू यॉर्क : अमेरिकेला महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देणारी सहकर्णधार मेगान रॅपिनो आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात विळी-भोपळ्याचे नाते. विश्वचषक जिंकल्यानंतर आपण व्हाइट-हाऊसमध्ये जाणार नाही, असे स्पर्धेआधीच जाहीर करणाऱ्या मेगानला ‘आधी विश्वचषक जिंकून दाखव,’ अशा शब्दांत ट्रम्प यांनी सुनावले होते. पण आता विश्वविजेतेपदाच्या मिरवणुकीदरम्यान मेगान हिने अप्रत्यक्षपणे डोनाल्ड ट्रम्प यांना चपराक लगावली आहे.

‘‘माझे भावनिक आवाहन आहे की, प्रत्येकाने अधिक चांगले बनण्याचा प्रयत्न करा. एकमेकांची घृणा करण्यापेक्षा प्रेम करा. आपण सर्वानीच बोलावे कमी आणि ऐकावे जास्त. ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. इथे उपस्थित असलेल्या किंवा नसलेल्या किंवा इथे असण्याची इच्छा नसलेल्यांचीही जबाबदारी आहे. हे जग अधिक चांगले ठिकाण बनायला हवे,’’ असे मेगान म्हणाली.

‘‘माझ्या मते, अमेरिकेच्या संघाने सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत अप्रतिम कामगिरी बजावली. आपली स्थिती ओळखून आपण या जगाचाच एक हिस्सा आहोत, हे या संधीद्वारे दाखवून दिले. आम्ही खेळतो, फुटबॉल खेळतो. आम्ही महिला खेळाडू आहोत, असे बोलले जाते. पण आम्ही त्यापेक्षाही जास्त काहीतरी आहोत. आपण त्यापेक्षाही बरेच काही आहोत,’’ असे सांगत मेगानने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला.

भाषणादरम्यान मेगानने सर्व समाजातील लोकांना एकत्र येण्याचे आवाहन केले. ती म्हणाली, ‘‘गेल्या काही वर्षांत बरेच मतभेद निर्माण झाले आहेत. मी स्वत: त्याची बळी ठरली आहे. पण आता एकत्र येण्याची वेळ आली आहे. कदाचित हे भाषण म्हणजे पुढचे पाऊल ठरेल, पण सर्वाना संघटित होण्याची गरज आहे.’’