निदहास चषकात शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ५ धावांची गरज असताना, षटकार खेचून दिनेश कार्तिक संपूर्ण देशाचा हिरो ठरला आहे. अंतिम फेरीत भारताने बांगलादेशवर मात करुन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं खरं, मात्र मोक्याच्या क्षणी चेंडू वाया घालवून आपली विकेट फेकणाऱ्या विजय शंकरवर भारतीय क्रीडा रसिक चांगलेच नाराज आहेत. सोशल मीडियावर सध्या दिनेश कार्तिकसोबत विजय शंकरही चांगलाच चर्चेचा विषय बनलेला आहे.

अवश्य वाचा – कार्तिकने तो षटकार खेचला नसता तर माझं काही खरं नव्हतं – विजय शंकर

कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात असे प्रसंग येणं स्वाभाविक मानलं जातं. अंतिम सामन्यातल्या या घटनेनंततर विजय शंकरने सर्वकाही विसरुन पुढे जाण्याचं ठरवलं आहे. सोशल मीडियातूनही विजय शंकरचे मित्र आणि काही नातेवाईक त्याला सहानुभूतीपर संदेश देत घडलेल्या घटनेचा जास्त विचार करु नकोस असा आपुलकीचा सल्ला देत आहेत. मात्र या सहानुभूतीचा आपल्याला जास्त त्रास होत असून जी गोष्ट आपण विसरण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच गोष्टीची आठवण परत परत करुन दिली जात असल्याचं विजय शंकरने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

अवश्य वाचा – धोनीच श्रेष्ठ, मी अजूनही विद्यार्थी -कार्तिक

अंतिम सामन्यातला तो क्षण वगळता संपूर्ण मालिकेत मी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे घडलेल्या घटनेचा विचार करुन मला माझ्या कामगिरीवर परिणाम करुन घ्यायचा नसल्याचंही विजय शंकर म्हणाला. काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार अंतिम सामना संपल्यानंतर विजय शंकरने स्वतःला आपल्या खोलीत कोंडुन घेतलं होतं. मात्र यावेळी दिनेश कार्तिकने शंकरची समजुत काढत त्याला सेलिब्रेशनमध्ये सहभागी करुन घेतलं होतं. भारताकडून खेळत असताना काही गोष्टी ग्राह्य धरुन चालायच्या असतात. सध्या सोशल मीडियावर मला ट्रोल केलं जातंय, मात्र अंतिम सामन्यात मी स्वतःच्या जीवावर भारताला विजय मिळवून दिला असता तर सोशल मीडियाने मला हिरो ठरवलं असतं. मात्र सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्मासह सर्व सिनीअर खेळाडूंनी मला तो प्रसंग विसरुन जाण्याचा सल्ला दिल्याचं शंकर म्हणाला.