क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रोईंगपटू दत्तू भोकनळ, हॉकीपटू युवराज-देवेंद्र वाल्मिकी, कबड्डीपटू नितीन मदने, अभिलाषा म्हात्रे यांसारख्या १०० हून अधिक खेळाडूंना यंदाच्या शिवछत्रपती पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आज २०१४-२०१७ वर्षासाठी शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा केली. १७ तारखेला गेट वे ऑफ इंडियावर संध्याकाळी ५:३० वाजता राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे.
पुरस्कार घोषणेत कोणत्याही प्रकारची उणीव राहु नये यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले. प्रत्येक क्रीडा संघटनेशी सविस्तर चर्चा करुन योग्य खेळाडूला पुरस्कार मिळेल याची काळजी मंत्रालयाने घेतल्याचं तावडे यानी स्पष्ट केलं. यंदाच्या शिवछत्रपती पुरस्कारासाठी किमान ३ राष्ट्रीय स्पर्धा खेळणं गरजेचं हा निकष ठेवण्यात आला होता. यावरुन प्रत्येक खेळाडूंचं मुल्यांकन करुन पुरस्कार घोषित करण्यात आल्याचं तावडे म्हणाले.
याचसोबत यंदा निकषांव्यतिरीक्त क्रीडा मंत्रालयाने अंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या काही खेळाडूंना थेट पुरस्काराची घोषणा केली आहे. याचसोबत यंदा पुरस्कारांच्या रकमेत काही प्रमाणात वाढही करण्यात आलेली आहे. आगामी राष्ट्रकुल आणि आशियाई खेळांचा विचार करता राज्यातील अंदाजे ६०-६२ खेळाडूंच्या सरावाचा खर्च राज्य सरकार करत असल्याचंही तावडेंनी स्पष्ट केलं. क्रीडा मंत्रालयाने जाहीर केलेल्या क्रियेनुसार निवड करण्यात आलेल्या नामांकित पुरस्कार्थींमध्ये पुढील मान्यवरांचा समावेश आहे.
बुद्धीबळ – ग्रॅण्डमास्टर अक्षयराज कोरे, (पुणे), विदित गुजराथी,(नाशिक)
लॉन टेनिस – प्रार्थना ठोंबरे, (सोलापूर)
जलतरण – मंदार आनंदराव दिवसे, (कोल्हापूर)
हॉकी – युवराज वाल्मिकी, देवेंद्र वाल्मिकी
कबड्डी – नितीन मदने, अभिलाषा म्हात्रे, किशोरी शिंदे
वेटलिफ्टिंग – ओंकार ओतारी, गणेश माळी
एव्हरेस्टवीर – आशिष माने, (सातारा)
क्रिकेट – रोहीत शर्मा,अजिंक्य रहाणे
जलतरण – सौरभ सांगवेकर
बॅडमिंटन – अक्षय देवलकर
ॲथलेटिक्स – ललिता बाबर
रोईंग- दत्तू भोकनळ
मार्गदर्शक – प्रविण आमरे
खाडी व समुद्र पोहणे – रोहन मोरे
दिव्यांग खेळाडू – सुयश जाधव
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 12, 2018 9:31 pm