अर्जेंटिना येथे सुरु असलेल्या युथ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली आहे. नेमबाजपटू तुषार मानेने 10 मी. एअर रायफल प्रकारात भारताला पहिलं पदक मिळवून दिलं, यानंतर ज्युडो प्रकारात भारताच्या ताबाबी देवीलाही रौप्यपदक मिळालं आहे. याचसोबत ताबाबी भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये ज्युडो प्रकारात (सिनीअर/ज्युनिअर) पदक मिळवणारी पहिली खेळाडू ठरली आहे.

रविवारी झालेल्या सामन्यात 44 किलो वजनी गटात ताबाबीने अंतिम फेरीत प्रवेश मिळवत भारतासाठी एक पदक निश्चीत केलं होतं. मात्र अंतिम फेरीत तिला व्हेनेझ्युएलाच्या मारिया गिमेन्झकडून पराभव स्विकारावा लागला. याआधी झालेल्या सामन्यात उपांत्य फेरीत ताबाबीने क्रोएशियाच्या खेळाडूवर 10-0 अशी एकतर्फी मात करत अंतिम फेरी गाठली होती. या स्पर्धेत 13 क्रीडा प्रकारांमध्ये भारताचे 46 खेळाडू सहभागी झाले आहेत, त्यामुळे भारताच्या खात्यात या स्पर्धेत किती पदक येतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.