अर्जेंटिना येथील Youth Olympics स्पर्धेत भारताच्या महिला हॉकीपटूंनी आपला विजयी धडाका कायम ठेवत स्पर्धेत सरळ दुसरा विजय मिळवला. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रियाला धूळ चारणाऱ्या भारताने दुसऱ्या सामन्यात उरुग्वेला सहज पराभूत केले. सोमवारी झालेल्या या सामन्यात भारताच्या संघाने उरुग्वेवर २-१ अशी मात केली.

विजयी सलामी दिलेल्या भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली होती. त्याचा फायदा भारताला झाला. आक्रमणपटू लालरेमसिआमी हिने सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. पण ही आघाडी फरक काळ टिकली नाही. उरुग्वेकडून १०व्या मिनिटाला माग्डलेना वर्गा हिने सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर १९व्या मिनिटाला पुन्हा एकदा लालरेमसिआमी हिने गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी सामना संपेपर्यंत कायम राखण्यात भारताला यश आले.

भारताचे १५ पैकी १३ प्रयत्न उरुग्वेच्या गोलकिपरने हाणून पाडले. सामन्यात चेंडूवर ताबा मिळवण्याच्या बाबतीतही उरुग्वेचा संघ सरस होता. पण भारताच्या लालरेमसिआमीपुढे त्यांचे काही चालू शकले नाही. आता भारताचा पुढील सामना बुधवारी होणार आहे.