अर्जेंटिनातील ब्युनास आयर्स येथे सुरु असलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला पहिल्यांदा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. यजमान अर्जेंटिनाने भारतीय महिलांवर 5-2 ने मात केली. पहिल्या तीन सामन्यांमध्ये सहज विजय मिळवल्यानंतर भारतीय महिलांना आज पहिल्यांदाच कडव्या आव्हानाचा सामना करावा लागला.

सातव्या मिनीटाला अर्जेंटिनाच्या सेलिना डी सँटोने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर आठव्या मिनीटाला भारताच्या मुमताझ खानने गोल झळकावत भारताला बरोबरी साधून दिली. मात्र सामन्यावर अर्जेंटिनाच्या महिला खेळाडूंचं वर्चस्व कायम राहिलं. 10 व्या मिनीटाला सोफिया रामेलोने गोल करत अर्जेंटिनाला पुन्हा 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर मध्यांतराला भारतीय खेळाडूंनी सामन्यात पुन्हा एकदा बरोबरी साधली.

मध्यांतरानंतर अर्जेंटिनाच्या महिलांनी सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व राखलं. ठराविक अंतराने लागोपाठ 3 गोल करत अर्जेंटिनाने आपली आघाडी 5-2 अशी वाढवली. यानंतर सामन्यात पुनरागमन करणं भारतीय महिलांना शक्य झालं नाही. या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

अवश्य वाचा – हॉकी विश्वचषकात एस. व्ही. सुनीलच्या सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह