13 July 2020

News Flash

माझ्या यशाचे श्रेय वडिलांना!

मेरठपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या परिक्षितगड गावातून प्रियमने वयाच्या सहाव्या वर्षी क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली.

 

युवा संघाचा कर्णधार प्रियम गर्गची स्पष्टोक्ती

एकवेळ क्रिकेटचे साहित्य खरेदी करण्याचीही कुवत नसताना आज भारतीय युवा संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळण्यापर्यंतचा प्रवास स्वप्नवत आहे. वडिलांचे कठोर परिश्रम आणि त्यागामुळेच मी इथवर मजल मारू शकलो, अशी भावुक कबुली प्रियम गर्गने मंगळवारी दिली.

२०२०च्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी (१९ वर्षांखालील) सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघाच्या कर्णधारपदी उत्तर प्रदेशच्या प्रियमची निवड करण्यात आली असून दक्षिण आफ्रिका येथे १७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी, २०२० या कालावधीत ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.

मेरठपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या परिक्षितगड गावातून प्रियमने वयाच्या सहाव्या वर्षी क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली. ११व्या वर्षी आईला गमावणाऱ्या प्रियमची तेव्हापासून वडील नरेश हेच पालनपोषण करीत आहेत.

‘‘माझे वडील हे शाळेचे बसचालक आहेत. त्याचप्रमाणे ते दूध विक्री, सामानांची ने-आण यांसारखेही व्यवसाय करतात. त्याशिवाय मोठा भाऊ आणि तीन बहिणी असा माझा परिवार आहे. त्यामुळे एकेकाळी आमच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीही पुरेसे पैसे नसायचे,’’ असे १९ वर्षीय प्रियम म्हणाला.

‘‘परंतु माझे क्रिकेटविषयीचे प्रेम आणि निष्ठा पाहून वडिलांनी काही जणांकडून उधारीवर पैसे घेत मला क्रिकेटचे साहित्य आणून दिले. त्याशिवाय माझ्यासाठी प्रशिक्षणाचीही सोय केली. त्यामुळे मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि आज त्यांच्यामुळेच मी युवा संघाचा कर्णधार झालो आहे,’’ असे प्रियमने सांगितले.

मात्र आज हा दिवस पाहण्यासाठी आई असती, तर माझा आनंद द्विगुणित झाला असता, असेही सचिन तेंडुलकरला आदर्श मानणाऱ्या प्रियमने सांगितले. त्याचप्रमाणे भारताला पाचव्यांदा विश्वविजेत्या बनवण्यासाठी कर्णधार म्हणून मी सर्वतोपरी योगदान देईन, असेही त्याने नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 12:48 am

Web Title: youth team captain priam garg clarified akp 94
Next Stories
1 इंग्लंड-न्यूझीलंड कसोटी मालिका : विल्यम्सन-टेलरमुळे दुसरी कसोटी अनिर्णीत
2 राज्य शालेय क्रिकेट स्पर्धा : नाशिकच्या मुलांना विजेतेपद
3 मुंबईच्या रणजी संघात अजिंक्य, पृथ्वीचा समावेश
Just Now!
X