युगा बिरनाळे, अनन्या पाणिग्रही व साहिल जोशी या स्थानिक खेळाडूंनी सोनेरी कामगिरी करीत ५८व्या राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविले. पुणे आंतर कचेरी क्रीडा संघटनेने आयोजित केलेल्या या स्पर्धेतील दुसऱ्या दिवशीही महाराष्ट्राच्या खेळाडूंचे वर्चस्व कायम राहिले.
शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेतील मुलांच्या १४ वर्षांखालील गटात साहिल जोशी याने १०० मीटर बॅकस्ट्रोक शर्यत १ मिनिट ११.९० सेकंदात जिंकली. मुलींच्या १९ वर्षांखालील गटात आंतरराष्ट्रीय खेळाडू अनन्या पाणिग्रही हिने हीच शर्यत १ मिनिट ४.२५ सेकंदांत पार करीत सुवर्णवेध घेतला. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात गिरिजा कुलकर्णी या पुण्याच्या खेळाडूने १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये कांस्यपदक मिळविले, तर १४ वर्षांखालील मुलींमध्ये नेहा प्रसाद व साक्षी भळगट या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी याच शर्यतीत अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळविले.
आकांक्षा व्होरा या महाराष्ट्राच्या खेळाडूने १७ वर्षांखालील मुलींच्या विभागात आपले वर्चस्व कायम राखताना ४०० मीटर वैयक्तिक मिडले शर्यत ५ मिनिटे ३१.०१ सेकंदात जिंकली. युगा बिरनाळे हिने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात ५० मीटर बटरफ्लाय शर्यतीचे विजेतेपद मिळविले. तिने हे अंतर ३१.९७ सेकंदात पार केले. ४०० मीटर वैयक्तिक मिडले शर्यतीत यश पवळे (१९ वर्षे मुले-रौप्य), प्रणिका आवाडे (१९ वर्षे मुली-कांस्य), नील देशमुख (१७ वर्षे मुले-कांस्य) या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकांची कमाई केली.
मुलांच्या १९ वर्षांखालील गटात मितेश कुटे याने १५०० मीटर फ्रीस्टाईल शर्यत १७ मिनिटे १७.८६ सेकंदात जिंकली. मुलींच्या १९ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या नमिता मदगुंडी व आसावरी जोगळेकर यांनी ८०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळविले.महाराष्ट्राने रिले शर्यतीत वर्चस्व गाजवताना १४ व १७ वर्षांखालील मुले व मुली या दोन्ही गटात ४ बाय १०० मीटर फ्रीस्टाईल रिले शर्यतींचे विजेतेपद मिळविले.