भारताचा डेव्हिस चषकपटू युकी भांब्रीने तैपेई एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत खळबळजनक विजयाची नोंद केली. युकीने जपानच्या तिसऱ्या मानांकित गो सोइडावर तीन सेटमध्ये मात करत उपांत्य फेरीत वाटचाल केली. बिगरमानांकित युकीने जागतिक क्रमवारीत ८७व्या स्थानी असलेल्या सोइडावर ६-४, ३-६, ६-३ असा विजय मिळवला. एक तास आणि ४८ मिनिटांच्या या लढतीत सोइडा विजयाचा प्रबळ दावेदार होता, मात्र युकीने अचूक सव्‍‌र्हिसवर भर देत पहिला सेट नावावर केला. दुसऱ्या सेटमध्ये सोइडाने लौकिकाला साजेसा खेळ करत सरशी साधली. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये युकीने आक्रमक पवित्रा स्वीकारला. सर्वागीण वावर, फटक्यांमधले वैविध्य आणि तंदुरुस्ती यांच्या बळावर युकीने तिसऱ्या सेटसह सामनाही जिंकला. याआधी या दोघांमध्ये झालेल्या लढतीत सोइडाने युकीवर विजय मिळवला होता. युकीने या पराभवाची परतफेड करत विजय मिळवला. उपांत्य फेरीत युकीची लढत द्वितीय मानांकित सॅम ग्रोथशी होणार आहे.