टेनिसच्या अकादमीची संख्या आपल्या देशात झपाटय़ाने वाढली आहे. मात्र अव्वल दर्जाच्या प्रशिक्षकांच्या अभावामुळे अपेक्षेइतकी गुणात्मक प्रगती झाली नाही, असे भारताचा अव्वल दर्जाचा टेनिसपटू युकी भांब्रीने सांगितले.

शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत युकी सहभागी झाला आहे. गेली दीड वर्षे तंदुरुस्तीच्या समस्येने तो चिंतेत आहे. मात्र त्यामधून तो आता पूर्णपणे सावरला आहे. आदित्य सचदेव यांच्या मार्गदर्शनाखाली तो लहानपणापासून टेनिसचा सराव करीत आहे. परदेशातील स्पर्धेसाठी त्याला ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक स्टीफन कूप यांचे मार्गदर्शन मिळते.

‘‘गेल्या १०-१२ वर्षांमध्ये एटीपी, आयटीएफ आदी विविध स्पर्धामुळे टेनिसची लोकप्रियता वाढली आहे. साहजिकच खेळाडूंची संख्याही वाढत चालली आहे. केवळ एक व दोन कोर्ट असलेल्या ठिकाणीही अकादमी सुरू केल्या जातात. अशा ठिकाणी कितपत आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळणार हाच मला नेहमी प्रश्न दिसून येतो. भरपूर कोर्ट्सच्या सुविधा असल्या, तर आपोआपच खेळाडूंना भरपूर वेळ सराव मिळू शकतो. तसेच पालकांचेही समाधान होते,’’ असे युकीने सांगितले.

‘‘ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंकरिता केंद्र शासनाने सुरू केलेली ‘ऑलिम्पिक पदक व्यासपीठ’ ही खरोखरीच चांगली योजना आहे. त्याचा फायदा टेनिसपटूंनाही मिळाला पाहिजे. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होणाऱ्या टेनिसपटूला परदेशातील स्पर्धासाठी प्रवास, निवास, भोजन, फिजिओ, प्रशिक्षण आदींकरिता दरवर्षी किमान ३५ लाख रुपये खर्च येतो. आंतरराष्ट्रीय क्रमवारीत प्रगती करण्यासाठी अशा स्पर्धामधील सहभाग अनिवार्य असतो. अशा खर्चाकरिता प्रत्येक वेळी पदरमोड करणे शक्य नसते. अन्य काही खेळांमधील खेळाडूंना परदेशातील स्पर्धाकरिता प्रवास खर्च शासनातर्फे दिला जातो. निदान तशी सुविधा आम्हा टेनिसपटूंना मिळाली पाहिजे,’’ असे युकीने सांगितले.

तो पुढे म्हणाला, ‘‘दुखापतीमुळे यंदा मला अनेक स्पर्धामध्ये भाग घेता आला नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रमवारीत मी पहिल्या सव्वाशे खेळाडूंमध्येही नाही. याची खंत मला निश्चित जाणवत आहे. पहिल्या १०० क्रमांकांमध्ये स्थान मिळवण्याचे माझे नजीकचे ध्येय आहे. त्यानंतर ग्रँडस्लॅम स्पर्धामध्ये चांगले यश मिळवणे व पहिल्या ५० खेळाडूंमध्ये झेप घेण्याचा माझा प्रयत्न राहील. सध्या मी फक्त एकेरीवरच अधिक लक्ष केंद्रित केले आहे. २०२०च्या ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मी आतापासूनच लक्ष केंद्रित करीत आहे.’’