* एकेरीच्या लढतीत युकी भांब्री पराभूत * जिरी वेसलेचा दणदणीत विजय * चेक प्रजासत्ताक ३-१ ने विजयी
राजधानी दिल्लीत अतिउष्ण वातावरणात चेक प्रजासत्ताक संघाला खेळवण्याचे भारतीय संघाचे डावपेच पूर्णपणे उलटले. शारीरिक सक्षमतेची कसोटी पाहणाऱ्या वातावरणाशी जुळवून घेत चेक प्रजासत्ताकने डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या प्ले ऑफ लढतीत भारतीय संघावर ३-१ अशा फरकाने विजय मिळवला. जिरी वेसलेच्या युकी भांब्रीवरील विजयासह चेक प्रजासत्ताकने डेव्हिस चषकातील प्रतिष्ठेच्या जागतिक गटातले स्थान कायम राखले. घरच्या मैदानावर झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाचे जागतिक गटात धडक मारण्याचे स्वप्न भंगले.
शनिवारी झालेल्या दुहेरीच्या लढतीत लिएण्डर पेस-रोहन बोपण्णा जोडी पराभूत झाल्याने भारतीय संघाला एकेरीच्या दोन्ही परतीच्या लढती जिंकणे क्रमप्राप्त होते. पहिल्याच लढतीत जिरी वेसलेने दिल्लीकर युकी भांब्रीचा सरळ सेट्समध्ये धुव्वा उडवला. जिरीच्या विजयासह चेक प्रजासत्ताक संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्याने एकेरीची दुसरी लढत रद्द करण्यात आली.
शुक्रवारी सोमदेव देववर्मनने जिरीवर दिमाखदार विजय मिळवला होता. उष्ण वातावरणाची सवय नसल्याने जिरी त्या लढतीत पूर्णत: निष्प्रभ ठरला होता. रविवारी मात्र उष्णतेला टक्कर देत जिंकण्याचे उद्दिष्ट घेऊन कोर्टवर उतरलेल्या जिरीने पहिल्या सेटमध्ये युकीची सव्‍‌र्हिस भेदत ३-१ अशी आघाडी घेतली. भेदक सव्‍‌र्हिसच्या बळावर जिरीने ५-२ अशी आघाडी वाढवली. स्लाइसच्या कौशल्यपूर्ण फटक्यासह जिरीने पहिला सेट नावावर केला.
दुसऱ्या सेटमध्ये युकीने खेळात सुधारणा करीत जिरीला टक्कर दिली. दोघांनीही सव्‍‌र्हिस न गमावल्याने ५-५ अशी बरोबरी झाली. मात्र युकीच्या फोरहँडच्या स्वैर फटक्यांचा फायदा उठवत जिरीने सव्‍‌र्हिस भेदत ६-५ अशी आघाडी घेतली. तीन खणखणीत बिनतोड फटक्यांच्या बळावर जिरीने दुसरा सेट जिंकला.
तिसऱ्या सेटमध्येच सामनाजिंकण्याचा निर्धार केलेल्या जिरीने ४-० अशी भक्कम आघाडी घेतली. युकीने एक गुण पटकावत सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला, मात्र जिरीने सव्‍‌र्हिस राखत ५-१ अशी वाटचाल केली. युकीने पुन्हा एक गुण कमावला. मात्र पुन्हा एकदा भेदक, बिनतोड फटक्याच्या आधारे जिरीने तिसऱ्या सेटसह सामन्यावर कब्जा केला.

शुक्रवारी माझी कामगिरी निराशाजनक झाली होती. आज मी शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा तय्यार होतो. मला देशासाठी जिंकायचे होते. विजयासह चेक संघाचा विजय आणि जागतिक गटातील स्थान कायम राहिल्याने आनंद झाला आहे. उष्ण वातावरणात खेळणे जिकिरीचे होते, म्हणूनच तीन सेटमध्येच सामना जिंकण्याचा निर्धार केला होता.
– जिरी वेसले

जिरीच्या खणखणीत सव्‍‌र्हिसमुळेच सामन्याचे पारडे फिरले. दुसऱ्या सेटमध्ये ५-५ अशी स्थिती होती. त्यानंतर जिरीला रोखण्यात अपयश आले. वातावरण थकवणारे होते, मी प्रयत्न केला, मात्र तो अपुराच ठरला.
– युकी भांब्री