प्रज्ञेश गुणेश्वरनची कारकीर्दीतील सर्वोच्च स्थानी झेप

नवी दिल्ली : जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल १०० खेळाडूंमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा एकमेव टेनिसपटू युकी भांब्रीच्या स्थानाला सोमवारी धक्का बसला. गुडघ्याच्या दुखापतीतून नुकताच सावरणाऱ्या युकीला गेल्या काही स्पर्धेतील सुमार कामगिरीमुळे अव्वल १०० खेळाडूंमधील स्थान गमवावे लागले असून त्याची १०७व्या स्थानी घसरण झाली आहे. मात्र रविवारी झालेल्या निंग्बो चॅलेंजर टेनिस स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवणाऱ्या प्रज्ञेश गुणेश्वरनने कारकीर्दीतील सर्वोच्च अशा १४६व्या स्थानी झेप घेतली आहे.

मागील आठवडय़ात झालेल्या युरोपियन खुल्या टेनिस स्पर्धेत युकीला पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला होता. यंदा एप्रिल महिन्यात युकीने अव्वल १०० खेळाडूंत स्थान मिळवले होते. तर प्रज्ञेशने २५ स्थानांनी मोठी झेप घेत थेट १४६वा क्रमांक गाठला. थॉमस फॅबिआनोविरुद्ध प्रज्ञेशला रविवारी पराभव पत्करावा लागला.

‘‘थॉमसविरुद्धचा सामना आम्हा दोघांसाठीही खरे तर आव्हानात्मक होता. मात्र अखेरीस थॉमसने माझ्यापेक्षा अधिक सरस खेळ केल्याने तोच विजेतेपदाचा हकदार होता. कारकीर्दीत पहिल्यांदाच अव्वल १५० खेळाडूंमध्ये स्थान मिळवल्याने निश्चितच आनंद झाला आहे. मात्र आता हे स्थान टिकवण्याची मोठी जबाबदारीही पार पाडावी लागणार आहे,’’ असे प्रज्ञेश म्हणाला.

याव्यतिरिक्त भारताच्या रामकुमार रामनाथनने १२४वा क्रमांक मिळवला आहे. तर सुमित नागल, साकेत मायनेनी आणि अर्जुन काढे ३१२, ३१६ व ३५६ व्या स्थानावर आहेत.

पुरुष दुहेरीतील भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णाने त्याचे ३०वे स्थान कायम राखले आहे. तर दिविज शरण (३९), लिएण्डर पेस (६२) आणि पुरव राजा (८८) क्रमांकावर आहेत.

महिला एकेरीतील भारताची तारका अंकिता रैनाने सहा स्थानांनी झेप घेत १९५वे स्थान पटकावले आहे. तर कर्मन कौर थंडीने २१५वा क्रमांक कायम राखण्यात यश मिळवले आहे.