पहिल्याच फेरीत थॉमस बर्डिचशी मुकाबला भारताचा टेनिसपटू युकी भांब्रीला सोमवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेत पुरुष एकेरीच्या पहिल्याच सामन्यात थॉमस बर्डिचच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार युकीला जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या बर्डीचशी मुकाबला करावा लागेल. युकीने ग्रँड स्लॅम स्पध्रेत एकेरी प्रकारात पहिल्यांदाच मुख्य फेरीत प्रवेश केला आहे. २०१५च्या हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या युकीने जागतिक क्रमवारीत अव्वल शंभर जणांमध्ये प्रवेश केला. या कामगिरीमुळेच त्याला हंगामातील पहिल्याच महत्त्वाच्या स्पध्रेत स्थान निश्चित करता आले. दरम्यान, भारताच्या साकेत मायनेनी यानेही मुख्य फेरीच्या दिशेने कूच केली आहे. त्याने पात्रता फेरीतील तिसऱ्या डावात प्रवेश केला आहे. दुसऱ्या डावात मायनेनीने इटलीच्या लॉरेंझो गिउस्टीनोवर ६-१, ७-६ (७) असा एक तास २५ मिनिटांत विजय मिळवला. मुख्य फेरीत प्रवेश निश्चित करण्यासाठी त्याला आणखी एका विजयाची आवश्यकता असून त्याच्यासमोर बोस्नीयाच्या मिर्झा बॅसीकचे आव्हान आहे.